लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी सर्वच पक्षातील प्रमुख नेते भिंगरी लावून प्रचारासाठी फिरत आहेत. प्रवासाचा वेळ वाचविण्यासाठी अनेक नेते हेलिकॉप्टरने प्रवास करत असतात. काँग्रेस नेते राहुल गांधी तमिळनाडूच्या निलगिरी येथून उड्डाण घेत असताना निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी केली, अशी बातमी पीटीआयने दिली आहे. तमिळनाडू पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भरारी पथकाच्या अधिकाऱ्यांनी निलगिरी येथे गांधींचे हेलिकॉप्टर लँड होताच त्याची तपासणी केली.
राहुल गांधी तमिळनाडूमधून केरळमधील वायनाड या मतदारसंघात जाणार होते. वायनाड येथे त्यांची जाहीर सभा आणि रोड शो आयोजित केलेला आहे. त्यासाठी निलगिरी येथे आलेल्या हेलिकॉप्टरची तपासणी करण्यात आली. २०१९ साली राहुल गांधी यांनी पहिल्यांदा या मतदारसंघातून विजय मिळविला होता. त्यानंतर यंदाही ते वायनाडमधून निवडणुकीसाठी उभे राहिले आहेत.
विशेष म्हणजे भारतीय कम्युनिस्ट पक्ष इंडिया आघाडीत सामील झालेला आहे. तरीही वायनाडमधून सीपीआयच्या नेत्या अॅनी राजा यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. तसेच केरळ भाजपाचे प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन यांनीही राहुल गांधी यांच्याविरोधात लढत देण्याचा निर्णय घेतलेला आहे.
केरळमध्ये लोकसभेचे २० मतदारसंघ आहेत. या सर्व जागांवर २६ एप्रिल रोजी एकाच टप्प्यात निवडणूक संपन्न होईल. तर तमिळनाडूतील ३९ लोकसभा मतदारसंघात १९ एप्रिल रोजी एकाच टप्प्यात मतदान पार पडणार आहे.