Rahul Narwekar And Raj Purohit News Update : भाजपाने ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर भाजपामध्ये नाराजी नाट्य सुरू झाले. अनेक इच्छूक उमेदवारांना संधी न दिल्याने ते बंडखोरीच्या तयारीत आहेत. कुलबा विधानसभा मतदारसंघातही हे बंडखोरीचं ग्रहण लागलं होतं. परंतु, मुंबईतील ही पहिली बंडखोरी भाजपाने मोडून काढली आहे. त्यामुळे घोषित झालेला उमेदवार आणि नाराज माजी मंत्री आता एकत्र मिळून विधानसभेची तयारी करणार आहेत. आज त्यांनी पत्रकार परिषद घेऊन या नाराजीनाट्यावर पडदा टाकला.
कुलाबा विधानसभा मतदारसंघात राहुल नार्वेकर आमदार आहेत. भारतीय जनता पक्षाच्या पहिल्या यादीत या मतदारसंघातून पुन्हा एकदा राहुल नार्वेकर यांना उमेदवारी देण्यात आली. परंतु, यामुळे माजी मंत्री राज पुरोहित नाराज झाले होते. त्यामुळे राज पुरोहित वेगळा निर्णय घेतील की काय अशी शक्यता वर्तवली जात होती. परंतु, देवेंद्र फडणवीसांनी या राज पुरोहितांची भेट घेऊन त्यांची नाराजी दूर केल्याचे बोलले जात आहे. त्यानंतर राहुल नार्वेकर आणि राज पुरोहित यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन मतदारांमधील संभ्रम दूर केला.
हेही वाचा >> घराणेशाही आणि बाहेरून आलेल्यांचे लाड होत असल्याने भाजप निष्ठावंतांमध्ये असंतोष
राहुल नार्वेकर म्हणाले, ” ही निवडणूक राज पुरोहितांची आहे, ही राहुल नार्वेकरांची निवडणूक आहे. आम्ही एकत्र येऊन किमान ५० हजार मतांनी ही निवडणूक जिंकू, असं मी कुलाब्यातील जनेतला सांगू इच्छितो. भाजपाच्या जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याकरता आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत.”
कुलाब्यातील राजकीय समीकरण काय?
दक्षिण मुंबईत अर्थात कुलाबा विधानसभा मतदारसंघात भाजपा नेते राज पुरोहित यांचा चांगलाच दबदबा होता. मात्र, २०१७ मध्ये झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीनंतर दक्षिण मुंबईत भाजपात दोन गट पडल्याचं बोललं जातं. २००९ व २०१४ मध्ये राज पुरोहित यांना कुलाबा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली होती. पण २००९ मध्ये त्यांचा पराभव झाला होता, तर २०१४ मध्ये ते प्रथमच विधानसभेवर निवडून गेले होते. त्यानंतर २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज पुरोहित यांना दुसऱ्यांदा उमेदवारी मिळण्याची शक्यता होती. मात्र, भाजपाने त्यांचा पत्ता कापत राहुल नार्वेकर यांना उमेदवारी दिली. कुलाबा विधानसभा मतदारसंघात २०१९ च्या निवडणुकीत भाजपाचे राहुल नार्वेकर यांनी विजय मिळवला होता, तर काँग्रेसच्या अशोक अर्जुनराव जगताप यांचा पराभव झाला होता. दरम्यान, आता २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत कुलाबा मतदारसंघातून विद्यामान आमदार ॲड. राहुल नार्वेकर पुन्हा वर्चस्व राखणार की उलटफेर होणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.