Shrivardhan Vidhan Sabha Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यात राजकीय घडामोडी वेगाने घडताना पाहायला मिळत आहेत. सर्वच नेत्यांनी आपआपल्या मतदारसंघात पुन्हा एकदा वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी कंबर कसली होती. त्यामुळे २०२४ च्या विधानसभेची निवडणूक अनेक नेत्यांसाठी प्रतिष्ठेची मानली जात होती. विधानसभेच्या निवडणुकीत रायगड जिल्ह्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघ देखील महत्वाचे ठरणार आहेत. राज्यात गेल्या पाच वर्षात प्रचंड राजकीय उलथापालथ झाल्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणातील समिकरणे बदलली आहेत. यामध्ये रायगडमधील श्रीवर्धन मतदारसंघ देखील चर्चेत राहिला. या मतदारसंघामध्ये सध्या आदिती तटकरे (Aditi Tatkare) या विद्यमान आमदार आहेत. तसेच त्या महायुतीच्या सरकारमध्ये महिला व बाल विकास मंत्री देखील आहेत.
श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ (Shrivardhan Vidhan Sabha Election) पूर्वी शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी या शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला आणि राष्ट्रवादीची पकड मजबूत केली. त्यानंतर आदिती तटकरे यांनीही मतदारसंघाची बांधणी केली आणि त्या २०१९ मध्ये श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघामधून आमदार झाल्या. सध्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) साठी हा मतदारसंघ सोपा मानला जात असला तरी बदलती राजकीय समीकरणे पाहता आणि मतांचे होणारे ध्रुवीकरण पाहता येणारी निवडणूक आव्हानात्मक होती. पण तरीही श्रीवर्धनमध्ये आदिती तटकरे यांचा विजय झाला आहे, तर महाविकास आघाडीच्या अनिल नवगणेंचा पराभव झाला.
हेही वाचा : Dindori : दिंडोरी विधानसभा मतदारसंघावर नरहरी झिरवाळांचं वर्चस्व, यंदा कोण मारणार बाजी?
श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) राजकारणाची समिकरणे ३६० अंशाच्या कोनात बदलल्यामुळे मतदार देखील याचा परिमाण पाहायला मिळतो. आता श्रीवर्धन, तळा, म्हसळा, माणगाव आणि रोहा तालुक्यातील काही गावे मिळून श्रीवर्धनचा मतदारसंघ तयार होतो. या मतदारसंघात आधी काँग्रेस आणि शेकाप आणि शिवसेना (Shivsena) हे पक्ष प्रमुख पक्ष म्हणून ओळखले जायचे. मात्र, पुढे काँग्रेस, शेकाप आणि शिवसेनेची ताकद कमी होत गेली आणि २००९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) ने मतदारसंघातील पकड मजबूत केली आणि सुनील तटकरेंनी इथे राष्ट्रवादीचा झेंडा फडकवला.
२०१४ मध्ये श्रीवर्धन मतदारसंघामधून अवधूत तटकरे निवडून आले. अवधूत तटकरे हे सुनील तटकरे यांचे पुतणे आहेत. मात्र, पुढे २०१९ मध्ये अवधूत तटकरे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत (ठाकरे) प्रवेश केला. अवधूत तटकरे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांना उमेदवारी मिळेल अशी चर्चा होती. त्यामुळे श्रीवर्धनमध्ये तटकरे विरुद्ध तटकरे अशी लढत होण्याची शक्यता होती. मात्र, श्रीवर्धन विधानसभा मतदार संघात शिवसेनेचे विनोद घोसाळकर यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळाली. त्यामुळे या मतदारसंघात विनोद घोसाळकर विरुद्ध राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे अशी लढत झाली. यामध्ये अदिती तटकरे यांचा विजय झाला होता. अदिती तटकरे या राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार सुनिल तटकरे यांच्या कन्या आहेत. अदिती तटकरे (Aditi Tatkare) २०१९ मध्ये ३८ हजार ७८३ मतांनी विजयी झाल्या होत्या.
हेही वाचा : Mankhurd Shivaji Nagar Assembly Constituency : सपाच्या अबू आझमींसमोर महायुतीचा निभाव लागणार का?
दरम्यान, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाकडून विनोद घोसाळकर यांनी या मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांचा फारसा प्रभाव पडू शकला नव्हता. दरम्यान, महायुतीत श्रीवर्धन मतदारसंघामधून आदिती तटकरे यांनी निवडणूक लढवली आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीनंतर रायगडच्या राजकारणात शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात कुरबुरी वाढल्याचंही बोललं जात आहे. श्रीवर्धन मतदारसंघात तटकरे कुटुंबातील तीन आमदार या मतदारसंघातून सातत्याने विधानसभेवर निवडून आले आहेत. त्यामुळे गेल्या दीड दशकात श्रीवर्धन हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाऊ लागला. तसेच या विधानसभा निवडणुकीतही तटकरेंचा करिष्मा कायम राहिल्याचं पाहायला मिळालं.
२०१९ च्या मतदारांची संख्या
२०१९ च्या निवडणुकीत आदिती तटकरे यांना ९२ हजार ०७४ मते पडली होती, तर शिवसेनेचे विनोद घोसाळकर यांना ५२ हजार ४५३ मतांवर समाधान मानावे लागले होते. मनसेच्या संजय गायकवाड यांना १ हजार ४७३ तर काँग्रेसचे बंडखोर उमेदवार ज्ञानदेव पवार यांना १ हजार ८४४ मते पडली होती. तसेच ३,७७२ मते नोटाला मिळाली होती.
२०२४ च्या निवडणुकीत किती टक्के मतदान झालं?
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत (Vidhan Sabha Elections 2024 Voting Percentage) रायगड जिल्ह्यात एकूण ६७.२३ टक्के मतदान झालं आहे. यामध्ये श्रीवर्धन मतदारसंघात श्रीवर्धन ६०.९० टक्के मतदान झालं आहे.