महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या गुढीपाडवा मेळाव्यात एक मोठी घोषणा करून अनेकांना मोठा धक्का दिला. गेल्या काही वर्षांपासून सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह भारतीय जनता पार्टीचा कडाडून विरोध करणाऱ्या राज ठाकरे यांनी मोदींना आणि महाराष्ट्रात महायुतीला पाठिंबा जाहीर केला. यावेळी राज ठाकरे यांनी मनसे लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचंही जाहीर केलं. तसेच महाराष्ट्र सैनिकांना आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले. दरम्यान, राज ठाकरे आता लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेणार असल्याची चर्चा आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महाराष्ट्रात भाजपा, शिवसेनेचा शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अजित पवार गट हे तीन मोठे पक्ष महायुतीत आहेत. यासह रामदास आठवलेंचा रिपाइं, रवी राणांचा युवा स्वाभिमान पक्ष, बच्चू कडूंची प्रहार जनशक्ती पार्टी आणि इतर लहान पक्षही महायुतीत आहेत. तीन प्रमुख पक्षांच्या सरकारबाबत बोलताना सत्ताधारी नेते सातत्याने ट्रिपल इंजिन सरकार असा उल्लेख करत आहेत. मात्र यात मनसेदेखील सहभागी झाल्यामुळे अनेकांना प्रश्न पडला आहे की, महायुतीत इतके पक्ष आणि मोठे नेते असूनही भाजपाला राज ठाकरे यांची गरज का भासली? यावर स्वतः राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राज ठाकरे यांनी बोलभिडूला दिलेल्या मुलाखतीवेळी त्यांना प्रश्न विचारण्यात आला की, राज्यात आधीच ट्रिपल इंजिन सरकार असतानाही त्यांना मनसेच्या चौथ्या इंजिनाची गरज का भासली? यावर राज ठाकरे यांनी त्यांच्या शैलीत उत्तर दिलं. राज ठाकरे म्हणाले, त्यांना माझ्याकडून इंजिन नव्हे, तर कोळसा हवा असेल.

हे ही वाचा >> मोदींनी महायुतीचे दरवाजे उघडल्याची चर्चा, उद्धव ठाकरेंची भूमिका काय? राऊत म्हणाले, “त्यांना माहिती आहे…”

राज ठाकरे यांच्या या उत्तरानंतर त्यांना विचारण्यात आलं की, चार इंजिनांची रेल्वेगाडी तयार झाली आहे. या गाडीला प्रवाशांसाठी डबे लागणार आहेत की फक्त इंजिनच असतील. त्यावर राज ठाकरे म्हणाले, मी आत्ता केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना समर्थन दिलं आहे. हा विषय लोकसभेच्या दृष्टीने मोदींना पाठिंबा देण्याचा आहे. मी मोदींवर आणि भाजपावर प्रचंड टीका देखील केली आहे आणि त्याची कारणं देखील मी भर सभेत सांगितली आहेत. गुढीपाडव्याच्या सभेतही मी त्याचा पुनरुच्चार केला होता. मी ज्या प्रकारे लोकांसमोर माझी मतं मांडली तशी मतं इतर कुठल्याही पक्षांनी कधी मांडली नाहीत. आज जे लोक मोदींचा किंवा भाजपाचा विरोध करत आहेत त्यांच्यापैकी कुठल्या नेत्याने किंवा पक्षाने माझ्यासारख्या भूमिका घेतल्या नाहीत. हे जे लोक (महाविकास आघाडी) आज मोदींविरोधात बोलतात ते केवळ थातुर-मातुर बोलतात, माझ्यासारख्या ठाम भूमिका कोणी मांडल्या नाहीत. त्यांना काही मिळालं नाही म्हणून विरोध करतात. यांना (उद्धव ठाकरे) जर २०१९ मध्ये मुख्यमंत्रीपद दिलं असतं तर आज या लोकांनी भाजपाचा आणि मोदींचा विरोध केला असता का? यांना सत्ता मिळाली नाही म्हणून हे सगळं चाललं आहे.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raj thackeray answer on why shinde fadnavis pawar govt need mns support asc