राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आहे. २० नोव्हेंबर रोजी २८८ जागांसाठी मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांच्या सभाही आयोजित करण्यात आल्या आहेत. या सभांमधून एकमेकांवर टीका-टिप्पणी आणि आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. अशातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर युती करण्यावरून पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं आहे.
मनसेनेचे उमेदवार राजू पाटील यांच्या प्रचारार्थ आज राज ठाकरे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीकास्र सोडलं. “गेल्या पाच वर्ष तुम्ही आठवून बघा, ज्या युतीसाठी जनतेने मतदान केलं त्यातील एक पक्ष उठतो आणि ज्यांच्या विरोधात एक हयात गेली, त्या काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर जाऊन बसतो, कारण काय तर फक्त गळ्यात मुख्यमंत्र्यांची माळ पडावी म्हणून. असा निर्णय घेताना त्यांनी त्यांच्या पक्षातील लोकांनाही कधी विचारलं नाही. मी, माझा स्वार्थ, माझी खुर्ची, माझं पद एवढचं उद्धव ठाकरे यांना हवं आहे”, असे राज ठाकरे म्हणाले.
“या लोकांना जनतेच्या मतांशी घेणं देणं नाही. मतदार जगला किंवा मेला तरी त्यांना काहीही फरक पडत नाही. मतदान फक्त मतदानाच्या दिवशी जगावा, नंतर मेला तरी चालेल, अशी या लोकांची भूमिका आहे. भाजपाबरोबर युतीत असताना मुख्यमंत्रीपद मिळालं नाही, तर त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर युती करून मुख्यमंत्री पदाची माळ गळ्यात घालून घेतली. बाळासाहेब म्हणाले होते, की माझ्या शिवसेनेची काँग्रेस होणार असेल, तर मी शिवसेना नावाचं दुकान बंद करेन, मात्र, उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेस राष्ट्रवादीच्या मांडीवर जाऊन बसले”, अशी टीकाही राज ठाकरे यांनी केली.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी एका सभेत बोलताना राज्यात सत्तेत आल्यानतंर प्रत्येक जिल्ह्यात शिवाजी महाराजाचं मंदिर बांधू, अशी घोषणा केली होती. यावरूनही राज ठाकरे यांनी त्यांना लक्ष्य केलं. “आज उद्धव ठाकरे शिवाजी महाराजांचं मंदिर बांधण्याची घोषणा करत आहेत, पण महाराष्ट्राला आज विद्या मंदिरांची आवश्यकता आहे. मंदिरांपेक्षा शिवाजी महाराजांचे गड किल्ल्यांचं संवर्धन आवश्यक आहे, जेणेकडून पुढच्या पिढीला महाराज काय हे कळेल”, असं ते म्हणाले.