राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोर धरू लागला आहे. ठिकठिकाणी राजकीय नेत्यांच्या प्रचारसभा आयोजित केल्या जात आहेत. अशातच या प्रचारसभेला जात असताना सलग दोन दिवस उद्धव ठाकरे यांची बॅग तपासण्यात आली आहे. यावरून आता विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही यावरून उद्धव ठाकरे यांच्यावर खोचक टीका केली आहे. भांडूपमधील सभेत बोलताना त्यांनी यासंदर्भात भाष्य केलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेमकं काय म्हणाले राज ठाकरे?

“काल आणि आज उद्धव ठाकरेंची बॅग तपासली. खरं तर निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना कुठं काय तपासावं हेसुद्धा कळत नाही. ज्या व्यक्तीच्या हातातून कधी पैसे सुटला नाही, त्या व्यक्तीच्या बॅगेत काय असणार आहे? फार फार तर हात रुमाल आणि कोमट पाणी, याशिवाय दुसरं काहीही असू शकत नाही”, अशी खोचक टीका राज ठाकरे यांनी केली.

हेही वाचा – Raj Thackeray : “मोरारजींनंतर राज ठाकरेच, त्यांच्या म्हणण्याला किंमत नाही”; संजय राऊतांची बोचरी टीका!

पुढे बोलताना ते म्हणाले, की “उद्धव ठाकरेंची बॅग तपासल्यानंतर आता त्याचा मोठा बाऊ केला जातो आहे. मुळात बॅग तपासण्यात गैर काय? अनेकदा आमच्याही बॅगा तपासण्यात आल्या. निवडणूक अधिकारी त्यांचं काम करत असतात. त्याचा एवढा तमाशा करायची गरजं नाही. त्यातही ते संबंधित अधिकाऱ्यांचा व्हिडीओ काढतात. त्याला नियुक्त पत्र दाखवायला सांगतात, मुळात कोणताही अधिकारी नियुक्ती पत्र घेऊन फिरतो का? कुणाला काय विचारावं, हेही उद्धव ठाकरेंना माहिती नाही. त्यांना फक्त मुख्यमंत्रीपद हवं आहे. या लोकांनी सगळा तमाशा करून ठेवला आहे”, अशी टीकाही राज ठाकरे यांनी केली.

हेही वाचा – पंतप्रधान मोदींच्या सभेपूर्वी शिवतीर्थावरील दीपोत्सवाचे कंदील काढल्याने राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, “हिंदुत्त्ववादी विचारांचे…”

सलग दोन दिवस उद्धव ठाकरेंच्या बॅगची तपासणी

दरम्यान, महाविकास आघाडीचे औसा विधानसभेचे अधिकृत उमेदवार दिनकर माने यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेला जाताना आज उद्धव ठाकरेंच्या हेलिकॉप्टरची झाडाझडती घेण्यात आली. उद्धव ठाकरेंनीही सामानाची तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी केली. त्यांचं नाव, त्यांचं नियुक्त पत्रक, एवढंच नव्हे तर त्यांच्या खिशातील पाकिटात किती पैसे आहेत, याचीही विचारणा केली. तत्पूर्वी काल वणी येथे उमेदवाराच्या प्रचाराला जात असतानाही त्यांच्या बॅगची तपासणी करण्यात आली होती. यावरून उद्धव ठाकरेंनी संताप व्यक्त केला होता. माझ्या बॅगची जशी तपासणी केली, तशी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार किंवा पंतप्रधान मोदी यांच्या बॅगांची तपासणी करणार का? असा प्रश्न त्यांनी अधिकाऱ्यांना विचारला होता.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raj thackeray criticized uddhav thackeray over bag checking issue spb