राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. २० नोव्हेंबर रोजी २८८ जागांसाठी मतदान पार पडणार आहे. त्यापार्श्वभूमीवर विविध मतदारसंघात दिग्गज नेत्यांच्या प्रचारसभा आयोजित करण्यात आल्या आहेत. १४ नोव्हेंबर रोजी मुंबईतील शिवाजी पार्क येथे पंतप्रधान मोदी यांचीही सभा पार पडणार आहे. मात्र, या सभेपूर्वीच शिवाजीपार्कवर मनसेने दीपोत्सवासाठी लावलेले कंदील सुरक्षेच्या कारणास्तव काढण्यात आले आहेत. यावरूनच आता राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे.
काय म्हणाले राज ठाकरे?
आज दिंडोशी विधानसभा मतदारसंघात राज ठाकरे यांची जाहीर सभा पार पडली. यावेळी त्यांनी या मुद्द्यावर प्रशासनाला लक्ष्य केलं. आपण दिवाळीला शिवाजी पार्कवर दीपोत्सव साजरा करतो. त्याचे व्हिडीओ आपण सर्वांनीच बघितले असतील. अनेक जण तिथे येऊन फोटो किंवा व्हिडीओ काढतात. पण रविवारी अचानक याठिकाणी वीज बंद करण्यात आली. तसेच सर्व मीटर्स बीएसटीवाले घेऊन गेले, कारण काय? तर १४ तारखेला तिकडे पंतप्रधानांची सभा आहे. मुळात दिवाळीच्या कंदीलांचा आणि पंतप्रधानांच्या सुरक्षेचा काय संबंध? पंतप्रधान आले असते आणि त्यांनी तिकडे कंदील बघितले असते, तर त्यांनाही आनंद झाला असता. नको तिकडे सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करतात, अशी टीका राज ठाकरे यांनी केली.
हिंदुत्त्ववादी विचारांचे पंतप्रधान येतात अन् तुम्ही…
दिवाळी हा आपला हिंदू सण आहे. तो सणासारखा साजरा नाही, करायचा तर कसा करायचा? दरवर्षी हे कंदील तुळशीच्या लग्नापर्यंत असतात, त्यानंतर आपण ते काढतो. या महाराष्ट्रात अनेकदा दहीहंडी बंदी आणण्याचा प्रयत्न झाला, गणपतींचे मंडप उभारण्याला विरोध झाला, त्यावेळी मसनेचे आवाज उठवला आणि या सणांवरची बंदी उठवली. आज हिंदुत्त्ववादी विचारांचे पंतप्रधान तिथे येतात आणि तुम्ही दिवाळीचे कंदील बंद करता म्हणजे तुमची कमालच आहे, असेही ते म्हणाले.
उद्धव ठाकरेंनीही केलं लक्ष
पुढे बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे यांनाही लक्ष्य केलं. ज्यांच्याविरोधात लढून एका पक्षाची हयात गेली, त्यांच्याबरोबर उद्धव ठाकरेंनी जाण्याचा निर्णय घेतला. आज बाळासाहेब असते, तर त्यांना हे बघून काय वाटलं असतं? बाळासाहेब म्हणायचे की माझ्या शिवसेनेची काँग्रेस होणार असेल तर मी शिवसेना नावाचं दुकानं बंद करेन, मात्र, उद्धव ठाकरेंनी त्याच काँग्रेसच्या शेजारी दुकान टाकलं. स्वत:च्या स्वार्थासाठी ते बाळासाहेबांचे विचार विसरले. मुख्यमंत्रीपद मिळावं म्हणून काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर हातमिळवणी केली, असा घणाघात राज ठाकरे यांनी केला.