महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक २० तारखेला पार पडणार आहे. आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. या दिवशी राज ठाकरेंनी शिवडी या ठिकाणी सभा घेतली. या सभेत त्यांनी उद्धव ठाकरेंचा उल्लेख खाष्ट सासू असा केला आहे. तसंच शिवसेनेचा खरा गद्दार तर घरात बसला आहे असं म्हणत टोलाही लगावला आहे. निवडणूक प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे. राज ठाकरेंनी शिवडी या ठिकाणी बाळा नांदगावकरांसाठी सभा घेतली. या सभेत त्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे.
काय म्हणाले राज ठाकरे?
“विधानसभा निवडणुकीसाठी मी ही शेवटची सभा घेतली आहे. ही सभा बाळा नांदगावकरसाठी आहे. येत्या २० तारखेला रेल्वे इंजिन या निशाणीवर बटण दाबून बाळा नांदगावकर यांना निवडून द्या.” असं आवाहन राज ठाकरेंनी केलं आहे. “बाळा नांदगावकरांना शिवसेना आणि भाजपाने जो पाठिंबा दिला आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. खरंतर बऱ्याच मतदारसंघात आभार मानता आले असते पण जाऊ दे तो विषय. महाराष्ट्रात अनेक विषय खोळंबलेले आहेत. आपल्याला त्या गोष्टी माहीत आहेत. महाराष्ट्रात सध्या खूप वाईट परिस्थिती आहे. हिंदुत्वाने भारवलेला हा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्राला जातीपातींमध्ये तोडण्याचं काम शरद पवारांनी केलं आहे. राष्ट्रवादीच्या जन्मानंतर हे सगळं सुरु झालं. आपल्या संतांनी दिलेल्या एकोप्याची शिकवण आपण विसरलो आहे यांचं स्वार्थी राजकारण त्याला जबाबदार आहे.” अशी टीका राज ठाकरेंनी केली.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होण्यासाठी काँग्रेससह गेले
मुख्यमंत्री व्हायचं, ती माळ गळ्यात घालायची म्हणून शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसबरोबर जाऊन बसली. हे कुठलं राजकारण आहे? मी देशाच्या राजकारणात आजवर अशी गोष्टच पाहिलेली नाही. ज्यांच्या विरोधात निवडणूक लढवली, निकाल आल्यावर त्यांच्या बरोबर जाऊन बसले. जातीयवाद भडकवून हे तुम्हाला विसरायला लावत आहेत. असाही आरोप राज ठाकरेंनी केला.
उद्धव ठाकरे राज ठाकरेला आडवा येतोच कसा?
मी मशिदींवरचे भोंगे खाली आणायला सांगितले होते. ते खाली आले सुद्धा. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना हा निर्णय घेतला गेला. त्यांच्या सरकारने १७ हजार मनसैनिकांवर केसेस टाकल्या. कारण काय? तर ते सगळे हनुमान चालीसा म्हणणार होते म्हणून. मला आठवतंय बाळासाहेबांनी त्यांच्या एका भाषणात सांगितलं होतं की मशिदींवरचे भोंगे खाली आले पाहिजेत. ती गोष्ट राज ठाकरे करुन दाखवत असेल तर उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा? असा प्रश्न राज ठाकरेंनी विचारला आहे.
हे पण वाचा- Eknath Shinde: राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात काय बिनसलं? शिंदे यांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले…
राहुल गांधीला अक्कल नाही-राज ठाकरे
“काँग्रेसच्या राहुल गांधीला अक्कल नाही, काँग्रेस स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करते. वर्षा गायकवाड राहुल गांधींना शिवछत्रपतींची प्रतिमा देत होत्या त्यांनी त्याकडे बघितलं आणि तोंड फिरवलं. महाराजांची प्रतिमा ज्या माणसाला घ्यायला लाज वाटते त्यांच्याबरोबर जाऊन हे (उद्धव ठाकरे) बसले आहेत. का बसले? स्वतःचा स्वार्थ.” असं राज ठाकरे म्हणाले.
एका माणसाने शिवसेना या पक्षाची वाट लावली
एका माणसाने सगळ्या पक्षाची वाट लावली. अनेक लोक निघून गेले, त्यांना हे म्हणतात गद्दार आहेत. गद्दार तर घरात तिथे बसला आहे, ज्याने पक्षाशी गद्दारी केली. एक उदाहरण देतो. एक कुटुंब असतं त्यात तीन मुलं असतात. पहिल्या मुलाचं लग्न होतं सून घरात येते. सासूबाईशी भांडण सुरु होतं. त्यामुळे तो मुलगा म्हणतो जाऊदेत आपण वेगळं होऊ. मग ते दोघं वेगळे होतात. लोक म्हणतात आज कालच्या मुली घरात आल्या की नीट बोलायला नको, काही करायला नको, आता वेगळे झाले आहेत. दुसऱ्या मुलाचं लग्न होतं सून घरात येते, सासूबाईंशी भांडण सुरु होतं. वाद सुरु होतात. दुसरा मुलगाही घर सोडून जातं. तिसरी सून येते. तिसऱ्या सुनेचंही सासूशी भांडण होतं. तिसरा मुलगाही घर सोडून जातो. तेव्हा लोक बोलायला लागतात काहीतरी सासूमध्येच प्रॉब्लेम आहे. शिवसेनेची जी सासू बसली आहे ना आतमध्ये तिचा प्रॉब्लेम आहे. ही मुलं सोडून गेली त्यांचा प्रॉब्लेम नाही. ही गोष्ट समजून घेतली पाहिजे. या लोकांनी तुमच्या मतांचा अपमान केला आहे त्याचा बदला तुम्ही घेतला पाहिजे. ही निवडणूक त्याची आहे असं राज ठाकरे म्हणाले आहेत.