महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे महायुतीचे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेचे उमेदवार नारायण राणे यांच्यासाठी सभा घेणार आहेत. येत्या ४ मे रोजी संध्याकाळी पाच वाजता राज ठाकरेंची सभा होणार आहे. ही जाहीर सभा कणकवली येथे पार पडेल. महायुतीच्या कोणत्याही उमेदवाराच्या प्रचारार्थ राज ठाकरे यांची ही पहिली जाहीर सभा असेल. महायुतीला बिनशर्त पाठिंबा दर्शवल्यानंतर राज ठाकरे पहिल्यांदाच महायुतीच्या एखाद्या नेत्यासाठी प्रचारसभेला संबोधित करणार आहेत. कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या समोरील पटांगणात ही सभा होणार असून महायुतीच्या कार्यकर्त्यांनी या सभेची तयारी करण्यास सुरुवात केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज ठाकरे आणि नारायण राणे यांच्यात फार पूर्वीपासून मैत्रीपूर्ण संबंध आहेत. दोघेही पूर्वी शिवसेनेत होते. मात्र राणे यांनी २००५ मध्ये तर राज ठाकरे यांनी २००६ मध्ये शिवसेना सोडली. त्यानंतर दोघांच्याही राजकीय वाटा वेगवेगळ्या होत्या. मात्र दोन्ही नेत्यांनी त्यांची मैत्री सांभाळली आहे. नारायण राणे सध्या भारतीय जनता पार्टीत असून त्यांना पक्षाने रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून लोकसभेचं तिकीट दिलं आहे. तर राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत भाजपाप्रणित महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्याने राज आणि नारायण राणे राजकीय पटलावर एकत्र आले आहेत. त्यामुळे राज ठाकरे राणे यांच्या प्रचारासाठी कणकवलीत सभा घेणार आहेत.

महायुती आणि नारायण राणे हे सध्या राज ठाकरेंच्या सभेची तयारी करत आहेत. भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच राणे यांच्यासाठी प्रचारसभा घेतली होती. आता राणे यांच्यासाठी राज ठाकरे सभा घेणार आहेत. राज ठाकरे यांच्या सभेला रत्नागिरी सिंधुदुर्गमधील मनसे कार्यकर्ते, राज समर्थक, राणे समर्थक आणि महायुतीचे कार्यकर्ते गर्दी करतील.

“…तर नारायण राणे शिवसेना सोडून गेलेच नसते”

राज ठाकरे यांनी गेल्या वर्षी मार्च महिन्यात तळकोकणात एका जाहीर सभेत वक्तव्य केलं होते की, राणे यांना शिवसेना सोडायची नव्हती. मात्र काही लोकांमुळे त्यांना तसा निर्णय घ्यावा लागला. राज ठाकरे म्हणाले होते, नारायण राणेंनी शिवसेना सोडलीच नसती. मी तुम्हाला तो प्रसंग सांगतो. नारायण राणे पक्ष सोडणार हे मला समजलं तेव्हा मी त्यांना फोन केला, मी त्यांना म्हटलं अहो राणे हे काय करताय? शिवसेना सोडू नका. नारायण राणे मला म्हणाले, मला जायचं नाही पण… त्यावर मी त्यांना सांगितलं की मी बाळासाहेबांशी बोलतो. राणेंचा फोन ठेवल्यावर मी लगेच बाळासाहेबांना फोन केला. त्यांना सांगितलं नारायण राणेंना शिवसेना सोडायची नाही. मला बाळासाहेबांनी लगेच सांगितलं त्याला घेऊन ये. मी नारायण राणेंना फोन केला आणि सांगितलं बाळासाहेबांनी बोलावलं आहे आपण जाऊ ते म्हणाले मी लगेच निघालो. हा फोन झाल्यानंतर पाच मिनिटांनी मला बाळासाहेबांनी फोन केला. मला म्हणाले नारायण राणेंना आणू नकोस, तेव्हा त्यांच्या मागून कुणीतरी बोलत होतं हे माझ्या लक्षात येत होतं. बाळासाहेबांनी फोन करून येऊ नकोस सांगितल्यावर मला राणेंना सांगावं लागलं की येऊ नका. मग सगळ्या पुढच्या गोष्टी घडल्या. लोकांनी बाहेर पडावं यासाठी परिस्थिती निर्माण केली गेली. तेव्हा शिवसेनेत जी परिस्थिती निर्माण झाली त्याचा शेवट हा आता असा झाला. मला उद्धव ठाकरेंच्या राजकारणाशी काहीही घेणंदेणं नाही.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raj thackeray will hold public meeting for narayan rane kankavli lok sabha election 2024 asc
Show comments