राजस्थानमधील विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आलेली असताना येथे काँग्रेसमधील अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील संघर्ष तीव्र होत चालला आहे. मागील काही दिवसांपासून सचिन पायलट यांच्याकडून गेहलोत यांच्यावर गंभीर आरोप केला जात आहे. गेहलोत यांच्याकडून वसुंधरा राजे सरकारमधील भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई केली जात नाहीये, असा दावा पायलट करत आहेत. असे असतानाच त्यांनी पुन्हा एकदा नव्याने गेहलोत यांना लक्ष्य केले आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस हायकमांडला या संघर्षावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा लागणार आहे. कर्नाटकमधील विधानसभा निवडणुकीनंतर दिल्लीमधील शीर्षस्थ नेते याबाबत ठोस निर्णय घेण्याची शक्यता आहे.
सचिन पायलट यांची गेहलोत यांच्यावर नव्याने टीका
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी मंगळवारी (९ मे) कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षण शिबिरात सहभागी होण्यासाठी माऊंट अबू येथे गेले होते. असे असताना सचिन पायलट यांनी अशोक गेहलोत यांच्यावर सडकून टीका केली. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या नेत्या सोनिया गांधी नव्हे तर वसुंधरा राजे आहेत, असा टोला पायलट यांनी लगावला. त्यानंतर राजस्थान काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले. दुसरीकडे गेहलोत यांनीदेखील थेट उल्लेख न करता सचिन पायलट आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर टीका केली. वसुंधरा राजे यांचा बालेकिल्ला असलेल्या ढोलपूर येथे गेहलोत यांनी एका सभेला संबोधित केले. या वेळी बोलताना त्यांनी वसुंधरा राजे तसेच अन्य दोन भाजपा नेत्यांचे कौतुक केले. “काँग्रेसच्या काही आमदारांना आमिष दाखवून २०२० साली विरोधी पक्षाच्या एका गटाकडून आमचे सरकार पाडण्याचा प्रयत्न झाला. मात्र या प्रयत्नांना वसुंधरा राजे आणि अन्य दोन भाजपाच्या नेत्यांनी साथ दिली नाही,” असे गेहलोत म्हणाले. सचिन पायलट यांच्या गटातील आमदारांना आमिष दाखवण्यात आले, असे गेहलोत यांना म्हणायचे होते.
हेही वाचा >> बोरामणी विमानतळ विकासाचा मुद्दा फक्त ढालीसाठी नको; व्यापक आंदोलनाची गरज
काँग्रेस हायकमांड पायलट यांच्या बाजूने की विरोधात?
पायलट यांनी नव्याने गेहलोत यांच्यावर टीका केल्यामुळे या दोन नेत्यांमधील संघर्ष आणखी तीव्र झाल्याचे जवळजवळ स्पष्टच झाले आहे. मात्र काँग्रेस हायकमांडने अद्याप यावर कोणतीही भूमिका जाहीर केलेली नाही. कर्नाटकची विधानसभा निवडणूक संपल्यानंतर कदाचित काँग्रेसचे नेतृत्व आपली भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे. यावरच पायलट गटातील एका नेत्याने प्रतिक्रिया दिली आहे. “मागील महिन्यात पायलट यांनी, आम्ही एका दिवसासाठी उपोषणाला बसू, असे जाहीर केले होते. त्यानंतर राजस्थान काँग्रेसचे प्रभारी सुखजिंदर सिंग रंधावा यांनी रात्री ११ वाजता एक निवेदन जारी केले होते. पायलट यांची कृती ही पक्षविरोधी ठरवण्यात येईल, असे त्या वेळी रंधावा यांनी जाहीर केले होते. आता पायलट यांनी गेहलोत यांना नव्याने लक्ष्य करून दोन दिवस झालेले आहेत. मात्र अद्याप काँग्रेसच्या नेतृत्वाने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे हायकमांड गेहलोत यांच्यासोबत आहे की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे,” अशी प्रतिक्रिया सचिन पायलट यांच्या गटातील एका नेत्याने दिली.
हेही वाचा >> Karnataka Election 2023 : प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात नरेंद्र मोदींचा ‘रोड शो’, तर राहुल गांधींकडून अनोखा प्रचार; कोण मारणार बाजी?
काँग्रेस लवकरच आपली भूमिका स्पष्ट करणार
काँग्रेस हायकमांड राजस्थानमधील या संघर्षावर लवकरच आपली भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे. याबाबतचे संकेत काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक सिंघवी यांनी दिले आहेत. “आमची याबाबत काय भूमिका आहे, हे लवकरच ठरवले जाईल. सर्वांनी थेट निष्कर्षापर्यंत येऊ नये. सर्वांनीच थोडा धीर धरायला हवा. आमची जी काही भूमिका असेल ती लवकरच सार्वजनिक केली जाईल,” असे सिंघवी यांनी सांगितले.
हेही वाचा >> Rajasthan : सोनिया गांधी नाही वसुंधरा राजे आहेत गेहलोत यांच्या खऱ्या नेत्या; सचिन पायलट यांची टीका
काँग्रेसला लवकर भूमिका स्पष्ट करावी लागणार?
दरम्यान, काँग्रेसच्या भूमिकेनंतर सचिन पायलट गट थेट लोकांमध्ये जाऊन आपली भूमिका मांडण्याची शक्यता आहे. याच कारणामुळे काँग्रेसच्या नेतृत्वाची सध्या अडचण झाली आहे. राजस्थानमध्ये विधानसभा निवडणूक काही महिन्यांवर आल्यामुळे काँग्रेस नेतृत्व पायलट यांची नेतृत्व बदलाची मागणी अमान्य करण्याची शक्यता आहे. यासह काँग्रेस जास्त काळासाठी पायलट यांच्याकडे दुर्लक्षही करू शकत नाही. त्यामुळे आगामी काळात काँग्रेस या अंतर्गत संघर्षावर काय निर्णय घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.