राजस्थानच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने मुसंडी मारली असून काँग्रेसला आपली सत्ता गमवावी लागली आहे. येथे भाजपाने ११५ जागांवर विजय मिळवला आहे. काँग्रेसला फक्त ६९ जागा जिंकता आल्या आहेत. दरम्यान, काँग्रेसचे वरिष्ठ नेते सचिन पायलट यांचा गड म्हणून ओळख असलेल्या पूर्व राजस्थानमध्येही काँग्रेसला चांगलाच फटका बसला आहे. पायलट यांचा हा गड भाजपाने भेदला असून अनेक ठिकाणी काँग्रेसचे मंत्री आणि विद्यमान आमदार पराभूत झाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२०१८ साली भाजपाचा २४ पैकी फक्त एका जागेवर विजय

पूर्व राजस्थानमध्ये सचिन पायलट यांचे राजकीय प्रस्थ आहे. याच कारणामुळे २०१८ सालच्या विधानसभा निवडणुकीत या भागात काँग्रेसने उत्तम कामगिरी केली होती. या भागातील भरतपूर, दौसा, ढोलपूर, करौली आणि सवाई माधोपूर या जिल्ह्यांतील एकूण २४ जागांपैकी भाजपाला फक्त एका जागेवर विजय मिळवता आला होता. परिणामी वसुंधरा राजे यांच्या नेतृत्वाखालील
भाजपाला पराभवाचा सामना करावा लागला होता. यावेळी मात्र भाजपाने एकूण २४ जागांपैकी तब्बल १३ जागांवर विजय मिळवला आहे. काँग्रेसला फक्त सात जागा जिंकता आल्या आहेत. उर्वरित तीन जागांवर अपक्ष उमेदवारांनी बाजी मारली आहे.

कोणाचा पराभव, कोणाचा विजय?

अशोक गेहलोत सरकारमध्ये मंत्री असलेल्या तसेच आमदार असलेल्या अनेक नेत्यांचा या निवडणुकीत पराभव झाला आहे. यात गेहलोत सरकारमधील मंत्री विश्वेंद्र सिंह यांचा दीग कुम्हेर मतदारसंघातून पराभव झाला आहे. त्यांना भाजपाचे उमेदवार शैलेश सिंह यांनी ७८९५ मतांनी पराभूत केले. वीर मतदारसंघातून अशोक गेहलोत सरकारमध्ये मंत्री असलेल्या बजनलाल जाटव यांचा भाजपाचे उमेदवार बहादूरसिंह कोली यांनी ६९०० मतांनी पराभव केला. यासह गेहलोत सरकारमध्ये मंत्री असलेल्या रमेश मीना यांचा सपोत्रा मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार हंसराज मीना यांंनी तब्बल ४३ हजार मतांनी पराभव केला. दौसा जिल्ह्यातील सिकारी मतदारसंघातून गेहलोत सरकारमध्ये मंत्री असलेल्या ममता भूपेश यांना भाजपाचे नेत विक्रम बंसिवाल यांनी नऊ हजार मतांनी पराभूत केले.

ERCP मुद्द्याचा काँग्रेसला फायदा नाही

या निवडणुकीत पूर्व राजस्थानच्या लोकांना आकर्षित करण्यासाठी भाजपाने पूर्व राजस्थान कालवा प्रकल्पाचा (ERCP)मुद्दा लावून धरला होता. या प्रकल्पाला केंद्रातील मोदी सरकार राष्ट्रीय प्रकल्पाचा दर्जा देत नाहीये, असा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला होता. त्याविरोधात काँग्रेसने आंदोलनही केले होते. मात्र, त्याचा काँग्रेसला निवडणुकीत फायदा झाला नाही. लोकांनी भाजपाच्या पारड्यात मतं दिली.

सचिन पायलट यांच्यामुळे काँग्रेसला मिळाली होती मते

२०१८ सालच्या निवडणुकीत काँँग्रेेसने पूर्व राजस्थानमध्ये चांगली कामगिरी केली होती. या काळात सचिन पायलट हे राजस्थान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते. दुसासारख्या जिल्ह्यात गुज्जर आणि मीना समाजाने काँग्रेसला मते दिली होती. पायलट हे गुज्जर समाजातून येतात. गुज्जर समाजाचा मुख्यमंत्री होईल, या एका अपेक्षेमुळे गुज्जर समाजाने तेव्हा काँग्रेसला भरभरून मते दिली होती. मात्र, अशोक गेहलोत यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडली. परिणामी गुज्जर समाजाचा भ्रमनिरास झाला. त्याचा परिणाम सध्याच्या निवडणुकीवर दिसून आला. गुज्जर समाज भाजपाचा पारंपरिक मतदार आहेत.

भाजपाची कामगिरी सुधारली

उदाहरण म्हणून घ्यायचे असेल तर दौसा जिल्ह्यात २०१८ साली भाजपा एकाही जागेवर जिंकू शकली नव्हती. या वर्षी मात्र एकूण चार जागांपैकी तीन जागांवर भाजपाने बाजी मारली आहे. ममता भूपेश, गेहलोत सरकारमध्ये आरोग्यमंत्री असलेले प्रसादी लाल मीना अशा बड्या नेत्यांचा या निवडणुकीत पराभव झाला. सवाई माधोपूर या जिल्ह्यातील भाजपाची कामगिरी सुधारली आहे. या भागात भाजपाने खासदार करोडी लाल मीना यांना उमेदवारी दिली होती. मीना यांनी काँग्रेसचे आमदार दिनेश बाबर यांचा पराभव केला. मीना २२ हजार मतांच्या फरकाने विजयी झाले.

काँग्रेसला गणित साधता आले नाही

काँग्रेसने करौली जिल्ह्यातील चारपैकी दोन जागांवर तसेच ढोलपूर जिल्ह्यातील चारपैकी तीन जागांवर विजय मिळवला आहे. या विजयामुळे पूर्व राजस्थानमध्ये काँग्रेसचा काही प्रमाणात तरी प्रभाव आहे, हा संदेश गेला. पूर्व राजस्थानवर प्रभूत्व म्हणजे राजस्थानमध्ये सत्ता आली, असे म्हटले जाते. काँग्रेसला मात्र यावेळी हे गणित साधता आले नाही. परिणामी, आता भजपाने येथे बहुमतात निवडणूक जिंकली आहे.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajasthan assembly election result bjp won in east rajasthan stronghold of sachin pilot prd
Show comments