Rajasthan Vidhan Sabha Election Result 2023 Updates, 3 December 2023 : पाच राज्यांपैकी पाच राज्यातील मतदारांचा कौल आता समोर आला आहे. चारपैकी तीन राज्यात भाजपाने मुसंडी मारली असून एका राज्यात काँग्रेसचं यश स्पष्ट झालं आहे. दरम्यान, यंदाच्या निवडणुकीत राजघराण्यातील सहा सदस्यांनी राजस्थान विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यापैकी पाच सदस्यांनी भाजपाच्या तिकिटावर तर एकाने काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली. यापैकी चारजणांना जनतेने स्वीकारलं आहे. राजस्थान विधानसभा निवडणुकीत राजघराण्यातील राजकीय समीकरण जाणून घेऊयात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वसुंधरा राजे

राजस्थानच्या दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या भाजप नेत्या वसुंधरा राजे झालावाडच्या झालरापाटन विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत होत्या. काँग्रेसचे उमेदवार रामलाल त्यांच्याविरोधात येथून उभे ठाकले आहेत. परंतु, वसुंधरा राजे सध्या ५२ हजार मतांनी आघाडीवर आहेत. वसुंधरा राजे ग्वाल्हेरची राजकन्या आणि धोलपूरची राणी आहेत. त्यांचा विवाह धौलपूरचा राजा हेमंत सिंह यांच्याशी झाला होता. वसुंधरा यांच्या आई विजयराजे सिंधिया या भाजपचा मूळ पक्ष असलेल्या जनसंघाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होत्या.

वसुंधरा यांनी पहिल्यांदा १९८५ मध्ये धौलपूरमधून विधानसभा निवडणूक लढवली होती, ज्यामध्ये त्या सुमारे २३ हजार मतांनी विजयी झाल्या होत्या. १९९३ मध्ये त्या ढोलपूरमधून हरल्या. यानंतर २००३ पासून त्या सातत्याने झालावाडच्या झालरापाटन विधानसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकत आहेत.

हेही वाचा >> वसुंधरा राजे पुन्हा राजस्थानच्या मुख्यमंत्री बनतील? काय आहेत राजकीय समीकरणं?

दिया कुमारी

जयपूरची राजकुमारी आणि भाजपच्या उमेदवार दिया कुमारी यांनी विद्याधर नगर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. आतापर्यंतच्या गणनेनुसार दिया कुमारी यांनी काँग्रेसचे उमेदवार सीताराम अग्रवाल यांना ७१३६८ मतांनी मागे टाकले आहे. दिया कुमारी ही महाराजा सवाई सिंह आणि महाराणी पद्मिनी देवी यांची कन्या. दिया यांनी १० वर्षांपूर्वी राजकारणात प्रवेश केला होता. २०१३ मध्ये सवाई माधोपूरमधून आमदार म्हणून त्या निवडून आल्या. २०१९ मध्ये राजसमंदमधून लोकसभा निवडणूकही त्यांनी जिंकली. भाजपने निवडणूक जिंकल्यास दिया याही मुख्यमंत्रिपदाच्या दावेदार असू शकतात, अशी चर्चा आहे.

सिद्धी कुमारी

माजी खासदार आणि बिकानेरचे महाराजा करणी सिंह बहादूर यांची नात सिद्धी कुमारी यांनी भाजपच्या तिकिटावर बिकानेर पूर्व मतदारसंघातून निवडणूक लढवली. आत्तापर्यंत हात आलेल्या कौलनुसार सिद्धी कुमारी काँग्रेसचे उमेदवार यशपाल गेहलोत यांच्यापेक्षा १३ हजारांहून अधिक मतांनी आघाडीवर आहेत. २००८ पासून त्या भाजपच्या तिकिटावर बीकानेर पूर्व मतदारसंघातून सातत्याने निवडणूक जिंकत आहेत.

कल्पना देवी

कोटाचे महाराज इज्यराज सिंह यांच्या पत्नी कल्पना देवी लाडपुरा मतदारसंघातून २५ हजार मतांनी आघाडीवर आहेत. २०१८ मध्ये कल्पना देवी यांनी भाजपच्या तिकिटावर पहिल्यांदा निवडणूक लढवली होती आणि एक लाखाहून अधिक मतांनी विजयी झाल्या होत्या. आतापर्यंतचा ट्रेंड पाहता जनता पुन्हा एकदा कल्पना सिंग यांच्याकडे मुकुट सोपवणार असल्याचे दिसते. काँग्रेसचे उमेदवार नईमुद्दीन गुड्डू पराभूत होताना दिसत आहेत.

विश्वराज सिंह मेवाड

महाराणा प्रताप यांचे वंशज विश्वराज सिंह मेवाड यांनीही भाजपच्या तिकिटावर नाथद्वारा मतदारसंघातून निवडणूक लढवली. सध्या ते काँग्रेसचे उमेदवार डॉ. राजकुमार शर्मा यांच्यावर सुमारे आठ हजार मतांनी आघाडीवर आहेत. विश्‍वराज सिंह यांचे वडील महेंद्र सिंह मेवाड हे देखील १९८९ मध्ये चित्तौडगडमधून भाजपचे खासदार होते. १७ ऑक्टोबर रोजी त्यांनी दिल्लीत पक्षाध्यक्ष चंद्र प्रकाश जोशी आणि राजसमंदच्या खासदार दिया कुमारी यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.

विश्वेंद्र सिंह

भरतपूरचे शेवटचे शासक ब्रिजेंद्र सिंह यांचे पुत्र विश्वेंद्र सिंह यांनी काँग्रेसच्या तिकीटावर दीग-कुम्हेर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. या जागेवरून भाजपचे उमेदवार डॉ. शैलेश सिंह हे विश्वेंद्र सिंहपेक्षा आठ हजारांहून अधिक मतांनी आघाडीवर आहेत. २०१८ मध्येही विश्वेंद्र सिंह शैलेश सिंह यांच्याकडून पराभूत झाले होते. विश्‍वेंद्र सिंह हे १९९९ ते २००४ दरम्यान भाजपच्या तिकीटावर तीन वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. भाजपा सरकारमध्ये ते दोनदा केंद्रीय मंत्रीही होते. २००८ मध्ये त्यांनी भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. २०१३ आणि २०१८ मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर सलग निवडणुका जिंकल्या. गेहलोत सरकारमध्ये ते मंत्रीही होते.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajasthan election result queen prince and princess in the lead congress ticket king defeated sgk
Show comments