Maharashtra Lok Sabha Election Results 2024 : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट पडल्यानंतर अजित पवारांचा गट महायुतीमधून तर शरद पवारांचा गट महाविकास आघाडीतून निवडणूक लढवत आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने १९ जागांवर निवडणूक लढवली होती. यापैकी बारामतीमधून सुप्रिया सुळे, रायगडमधून सुनील तटकरे, शिरूरमधून डॉ. अमोल कोल्हे आणि साताऱ्यातून श्रीनिवास पाटील विजयी झाले होते. पक्ष फूटल्यानंतर एकटे सुनील तटकरे हे अजित पवारांबरोबर गेले तर इतर तीन खासदारांनी शरद पवारांबरोबर थांबणं पसंत केलं.
यंदा राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला महाविकास आघाडीत १० तर अजित पवार गटाला महायुतीत ४ जागा मिळाल्या आहेत. यापैकी बारामती आणि शिरूर या मतदारसंघात या दोन गटांचे उमेदवार आमनेसामने आहेत. बारामतीत विद्यमान खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात लढत होत आहे. संपूर्ण देशाचं लक्ष या निवडणुकीकडे लागलं आहे. आपल्या पत्नीला जिंकवण्यासाठी अजित पवार यांनी या मतदारसंघात गेले अनेक महिने जोरदार मोर्चेबांधणी केली होती. मात्र, अजित पवारांच्या प्रयत्नांना फारसं यश मिळाल्याचं दिसत नाहीये. कारण आज सकाळी मतमोजणीला सुरुवात झाल्यापासून सुप्रिया सुळे या आघाडीवर आहेत. दुपारी २ वाजेपर्यंत हाती आलेल्या नुकालांनुसार सुप्रिया सुळे यांना १४ हजार मतांची आघाडी मिळाली आहे.
दरम्यान, बारामती लोकसभा निवडणुकीच्या आतापर्यंत हाती आलेल्या निकालांवर पवार कुटुंबाकडून पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. आमदार रोहित पवार यांचे वडील आणि शरद पवार यांचे पुतणे राजेंद्र पवार यांनी बारामतीच्या मतमोजणीवर भाष्य केलं आहे. राजेंद्र पवार म्हणाले, “सुप्रिया सुळे या सध्या आघाडीवर आहेत. मतमोजणीच्या अद्याप काही फेऱ्या बाकी आहेत. त्यांना अजून मोठी आघाडी मिळेल. पवार कुटुंब आता पूर्वीसारखं राहिलं नाही. कुटुंबातही आता दोन गट पडले आहेत. मात्र ही निवडणूक सर्वसामान्य जनतेने ताब्यात घेतल्यामुळे सुप्रिया सुळे आघाडीवर कायम राहतील आणि त्यांचाच विजय होईल.”