जवळपास दोन महिने तिहार तुरुंगात काढल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन दिला आहे. तुरुंगातून बाहेर पडल्यावर केजरीवाल आता राजकीय व्यासपीठांवर दिसू लागले आहेत. तसेच लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीची मोर्चेबांधणी करत आहेत. दरम्यान, दिल्लीमधील आपच्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केजरीवाल म्हणाले, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी जिंकली तर ४ जूननंतर विरोधी पक्षांमधील अनेक नेते गजाआड होतील. याचबरोबर केजरीवाल यांनी दावा केला की, “निवडणुकीच्या निकालानंतर दोन महिन्यांनी मोदी पंतप्रधानपदाचा राजीनामा देतील आणि अमित शाह हे पंतप्रधान होतील.”

नरेंद्र मोदींनी भारतीय जनता पार्टीची सूत्रं हाती घेतल्यानंतर पक्षातील नेत्यांसाठी एक नियम बनवला. त्यांनी वयाची पंच्याहत्तरी पार केलेल्या नेत्यांनी राजकारणातून निवृत्ती घेण्याचा नियम केला. या नियमांतर्गत भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशींसारख्या पक्षातील मातब्बर नेत्यांना पक्षाच्या सल्लागार मंडळात नियुक्त करण्यात आलं. मोदी पुढच्या वर्षी ७५ वर्षांचे होत आहेत. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीनंतर काही महिन्यांनी ते पंतप्रधानपदाचा राजीनामा देतील आणि अमित शाह हे देशाची धुरा हाती घेतील, असे दावे केले जात आहेत. केजरीवाल यांनी म्हटलं आहे की, “सध्या नरेंद्र मोदी हे स्वतःसाठी नव्हे तर अमित शाह यांच्यासाठी मतं मागत आहेत.”

केजरीवाल यांच्यासह विरोधकांनी केलेल्या दाव्यांवर भाजपाचे वरिष्ठ नेते आणि देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राजनाथ सिंह म्हणाले, मी भारतीय जनता पार्टीचा एक वरिष्ठ नेता म्हणून सांगतोय. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर नरेंद्र मोदी हेच देशाचे पंतप्रधान होतील. तसेच २०२९ च्या लोकसभा निवडणुकीनंतरही मोदीच देशाचे पंतप्रधान होतील. मला वाटतं तुम्ही (प्रसारमाध्यमं) ज्या प्रकारची चर्चा करताय, त्यावर यापेक्षा दुसरं कुठलंही स्पष्ट उत्तर असू शकत नाही. मोदी हेच पंतप्रधान होणार आहेत. आम्ही याहून वेगळा विचार केलेला नाही आणि तसा करताही येणार नाही.

हे ही वाचा >> शिवसेना, राष्ट्रवादी, मनसेची ताकद, तरी मोदींना महाराष्ट्रात इतक्या सभा का घ्याव्या लागतायत? फडणवीसांनी सांगितलं कारण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संरक्षणमंत्री म्हणाले, ज्या व्यक्तीने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या देशाची प्रतिमा इतकी उंचावली आहे, ज्या व्यक्तीने आपल्या देशाची प्रतिष्ठा वाढवली आहे, आपली अर्थव्यवस्था मजबूत केली आहे, तीच व्यक्ती भारताची पंतप्रधान होईल. आता आंतरराष्ट्रीय कंपन्या आणि संस्थदेखील दावा करत आहेत की जो भारत २०१४ पर्यंत तंत्रज्ञानाच्या जगात ११ व्या क्रमांकावर होता, तोच भारत नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात ११ व्या क्रमांकावरून उडी मारून पाचव्या क्रमांकावर आला आहे. मी ठामपणे सांगतोय की २०२७ पर्यंत आपला भारत तंत्रज्ञानाच्या जगात तिसऱ्या क्रमांकावर असेल.