अमरावतीच्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार नवनीत राणा यांनी पुन्हा एकदा AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवैसींवर टीका केली आहे. “मी ओवैसींनी आव्हान देते हैदराबादला मी येते मला रोखून दाखवा.” असंही त्या म्हणाल्या. आज देशभरात रामभक्त आहेत हे विसरु नका असंही नवनीत राणा म्हणाल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नेमके काय आरोप प्रत्यारोप झाले?

भाजपाच्या अमरावतीमधील उमेदवार नवनीत राणा यांनी नुकताच हैदराबादमध्ये लोकसभेच्या भाजपाच्या उमेदवार माधवी लता यांच्यासाठी प्रचार केला. यावेळी त्यांनी २०१३ च्या अकबरुद्दीन ओवैसी यांच्या एका विधानावरून ओवैसी बंधूंवर जोरदार टीका केली. “आम्हाला १५ मिनिटे नाही, तर १५ सेकंद लागतील”, असे त्या म्हणाल्या. दरम्यान, नवनीत राणांच्या या टीकेला आता असदुद्दीन ओवैसी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “मी तुम्हाला १५ सेकंद नाही, तर १ तास देतो, तुम्ही काय करू शकता सांगा?” असं ओवैसी म्हणाले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा रामभक्त प्रत्येक ठिकाणी आहेत असं नवनीत राणांनी ओवैसींना सुनावलं आहे.

काय म्हणाल्या नवनीत राणा?

“आम्हाला १५ सेकंदच लागतील असं त्या पुन्हा एकदा म्हणाल्या आहेत. तसंच आता मी त्यांना सांगू इच्छिते की रामभक्त सगळ्या देशभरात आहेत.” तर ओवैसी यांनी दुसरीकडे असं उत्तर दिलं आहे की तुम्हाला १५ सेकंद काय मी १५ दिवस देतो. काय करायचं आहे ते करुन दाखवा असं उत्तर नवनीत राणांना ओवैसींनी दिलं आहे.

हे पण वाचा- “मी माझ्या भावाला सांगितलं तर…”, असदुद्दीन ओवैसींचा नवनीत राणांना इशारा; म्हणाले, “कोणाच्या बापाला…”

नेमकं काय म्हणाल्या होत्या नवनीत राणा?

एका भाषणात असदुद्दीन ओवैसी यांचे बंधू अकबरुद्दीन ओवैसी यांनी भाजपावर टीका करताना, “१५ मिनिटांसाठी पोलीस हटवा, मग आम्ही काय आहोत, हे तुम्हाला दाखवतो”, असं विधान केलं होतं. याच विधानाच्या हवाला देत नवनीत राणा यांनी ओवैसी बंधूंवर निशाणा साधला होता. “छोट्या भावाने १५ मिनिटांसाठी पोलीस बाजूला करण्यास सांगितले होते. मी आज त्यांना सांगू इच्छिते, छोट्या तुला १५ मिनिटे लागत होती. पण आम्हाला फक्त १५ सेकंद लागणार आहेत. जर १५ सेकंदासाठी पोलिसांना बाजूला केले, तर छोट्या भावाला समजणारही नाही, कुठून आले आणि कुठे गेले.” अशी टीका नवनीत राणा यांनी केली होती.

एमआएमच्या इतर नेत्यांनीही केलं भाष्य

यासंदर्भात बोलताना, “अमरावतीत आपला पराभव होणार, हे नवनीत राणा यांना माहिती असल्याने त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. त्यामुळे त्या अशाप्रकारे विधानं करत आहेत. निवडणूक आयोगाने त्यांच्या विरोधात कारवाई करायला हवी. भाजपाकडून तुष्टीकरण करण्याचा प्रयत्न होतो आहे”, अशी प्रतिक्रिया एआयएमआयएमचे नेते वारिस पठाण यांनी दिली. तर खासदार इम्तियाज जलील यांनी राणाच्या टीकेवर भाष्य करण्यास नकार देत, “अशा मूर्ख लोकांसाठी आमच्याकडे वेळ नाही”. असे ते म्हणाले.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ram devotees are everywhere in india said navneet rana and targets asaduddin owaisi scj