Ram Satpute On Mohite Patil: नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यात महायुतीने दमदार विजय मिळवला. यामध्ये भारतीय जनता पार्टीने १३२ जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला. आता भाजपच्या नेतृत्त्वाखाली राज्यात सत्तास्थापनेसाठी महायुतीच्या हालचाली सुरू आहेत. अशात देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत जवळचे आणि माळशिरस मतदारसंघातून पराभूत झालेले माजी आमदार राम सातपुते यांनी मोठा दावा करत भाजपाचेच विधान परिषद आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. रणजितसिंह मोहिते पाटील यांनी पक्षविरोधी काम केले असून, त्यांना क्षमा करू नये अशी मागणी देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे. राम सातपुते यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर करत ही मागणी केली आहे.
काय म्हणाले राम सातपुते?
आपल्या एक्स पोस्टमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी टॅग करत माजी आमदार राम सातपुते म्हणाले, “भाजपाची आमदारकी भोगत असलेले रणजितसिंह मोहिते पाटील यांनी निवडणुकीपूर्वी सातारा येथे एका भाजपा आमदाराकडे जाऊन, त्यांना तुम्ही राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षात प्रवेश करा, भाजपचे ५० आमदार निवडून येत नाहीत, तुम्ही मंत्री व्हाल अशी गळ घातली होती. काल त्या आमदाराने देवेंद्र फडणवीस यांना माझ्यासमोर हा प्रकार सांगितला. आता गद्दारांना क्षमा नको.”
u
राम सातपुतेंचा माळशिरसमधून पराभव
२०१९ मध्ये मोहिते पाटील कुटुंब भाजपामध्ये आल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे निकटवर्तीय राम सातपुतेंना राखील मतदारसंघ असलेल्या माळशिरसमधून उमेदवारी दिली. पुढे मोहिते पाटलांनी राम सातपुते यांना सुमारे चार हजारांच्या मताधिक्याने निवडून आणले होते. पण, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत धैर्यशील मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादीत (शरद पवार गट) प्रवेश करत माढा लोकसभा जिंकली. त्यामुळे यंदा सातपुतेंना मोहिते पाटलांची मदत मिळाली नाही. अशात उत्तम जानकर यांनी राम सातपुते यांचा १३ हजार मतांनी पराभव केला. या पराभवानंतर राम सातपुते सातत्याने भाजपा आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी आपल्या पराभवासाठी प्रयत्न केल्याचे आरोप करत आहेत. यापूर्वीही त्यांनी एक्सवर पोस्ट करत मोहिते पाटलांवर आरोप केले होते.
माढा लोकसभेत मोहिते पाटलांचा विजय
सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत माढ्यात भाजपाकडून धैर्यशील मोहिते पाटील निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक होते. पण पक्षाने त्यांना संधी नाकारली. त्यानंतर मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादीत (शरद पवार गट) प्रवेश करत निवडणूक लढवली आणि जिंकली होती.