महाष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघापैकी बहुतांशी जागांवरील निकालांचं चित्र स्पष्ट झालं आहे. राज्यात काँग्रेसला १२, भाजपाला ११, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला १०, एकनाथ शिंदे गटाला सहा, शरद पवार गटाला सात, एक जागा अजित पवार गटाला व एक जागा अपक्ष उमेदवाराला जिंकण्यात यश आलं आहे. महाराष्ट्रातील या अनपेक्षित निकालाची जोरदार चर्चा आहे. अशातच महाराष्ट्राच्या निकालावर रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“आता कुणाला दोष देण्याचा विषय नाही, जे निकाल आले आहेत ते स्वीकारायला पाहिजे. आम्हाला विश्वास होता की मोदींनी इतकं काम केलं आहे, त्यामुळे मतं मिळतील. पण लोकांनी मतं का दिली नाहीत, याचा विचार करावा लागेल. मला वाटतं की महाराष्ट्रात इतक्या जागा येण्याचं कारण शिवसेना व राष्ट्रवादीतील फूट आहे. त्यामुळेच लोकांनी महाराष्ट्रात उद्धव ठाकरे व शरद पवारांना जास्त पसंती दिली. महाराष्ट्रातील फोडाफोडीच्या राजकारणाचा इतर राज्यांवरही परिणाम झाला असावा. कारण लोकांना वाटतं की भाजपाने पक्ष फोडण्याचं काम केलं, पण ते स्वतःच आमच्याकडे आले होते, भाजपाने फोडाफोडीचं काम केलं नव्हतं. आता इतर मुद्द्यांवर आम्ही विचार करू. अपेक्षेप्रमाणे निकाल आलेले नाहीत, पण अजून काही जागांवर मतमोजणी सुरू आहे, त्यामुळे किती जागा आम्हाला मिळतात, ते पाहू. मला वाटतं की आम्ही ३२५ जागा मिळवू आणि मोदींच्या नेतृत्त्वात सरकार स्थापन करू,” असं रामदास आठवले म्हणाले.
“मी स्मृती इराणींविरोधात निवडणूक लढलो नाही, तर…”; अमेठीतील विजयी काँग्रेस नेत्याची प्रतिक्रिया
उत्तर प्रदेशातील निकालांबद्दल रामदास आठवले म्हणाले, “यूपीमध्ये विकासाची कामं झाली, पण लोकांनी विकासाकडे लक्ष दिलं नाही. ४०० हून जास्त जागा आल्यास संविधान बदलतील, असा प्रचार विरोधकांनी केला. लोकशाही धोक्यात असल्याचं ते म्हणत होते, त्याचा परिणाम झाला असावा. २०१४ व २०१९ मध्ये हे सर्व विरोधक वेगवेगळे निवडणूक लढले होते, पण यावेळी ते मोदींना हरवण्यासाठी सर्व एकत्र आले, त्यामुळे त्याचेही परिणाम दिसत आहेत. विरोधकांनी वारंवार खोटं बोलून मतं मिळवण्याचा प्रयत्न केला.”
“दुर्दैवाने मोदींच्या हुकुमशाही मानसिकतेमुळे…”, सुब्रह्मण्यम स्वामींची सूचक पोस्ट
पुढे ते म्हणाले, “संविधान बदलण्याचा विषयच येत नाही. संविधानाला धक्का लावणार नाही, असं मोदी खूपदा म्हणाले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल आम्हाला आदर असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. पण तरीही विरोधकांनी संविधान बदललं जाईल व लोकशाही धोक्यात येईल अशा अफवा पसरवल्या आणि लोकांना भरकटवलं म्हणून लोक आमच्या विरोधात गेले, आम्ही जनमताचा कौल स्वीकारतो. पण मोदींच्या नेतृत्वात एनडीए सरकार स्थापन करेल, असा मला विश्वास आहे.”