नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले, तर देशातील संविधान बदलतील, असा आरोप काँग्रेससह विरोधी पक्षांकडून सातत्याने करण्यात येत आहे. यासंदर्भात राजकीय वतुर्ळातही विविध चर्चा सुरू आहे. दरम्यान, काँग्रेसच्या या आरोपांना आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) चे अध्यक्ष रामदास आठवले यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. बीडमध्ये आयोजित महायुतीच्या प्रचारसभेत बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नेमकं काय म्हणाले रामदास आठवले?

“मी दलित समाजाला सांगतो की या देशाचं संविधान कोणीही बदलू शकत नाही. जर कोणी संविधान बदलण्याचा प्रयत्न केला. तर त्यांच्या पाठीत लाथ घातल्याशिवाय आम्ही राहणार नाही. मुळात या देशाचं संविधान ज्या लोकांनी बदललं तेच लोक आज संविधान बदलण्याचा आरोप करत आहेत”, असं प्रत्युत्तर रामदास आठवले यांनी दिलं.

हेही वाचा – बारामतीतील लढतीवर रामदास आठवले यांची प्रतिक्रिया

“संविधान दिवस साजरा करण्याची सुरुवात मोदींनी केली”

“बाबासाहेबांनी २६ नोव्हेंबर रोजी या देशाला संविधान सुपूर्त केलं होते. त्यादिवशी संविधान दिवस साजरा करण्याचा आदेश पंतप्रधान मोदी यांनी दिला. तेव्हापासून आज देशातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये संविधान दिवस साजरा केला जातो आहे. काँग्रेसला हे कधीच सुचलं नव्हतं. तसेच बाबासाहेबांना भारतरत्न देण्याचं आणि त्यांचा फोटो सेट्रल हॉलमध्ये लावण्याचेही काँग्रेसला कधीच सुचलं नाही”, अशी टीकाही त्यांनी केली.

“…मग नरेंद्र मोदी संविधान कसं बदलणार?”

“दिल्लीत ज्याठिकाणी बाबासाहेबांनी संविधान लिहिलं, त्याजागी स्मारक बनवण्यासाठी मी अनेकदा काँग्रेसच्या नेत्यांना भेटलो. मात्र, त्यांनी हा विषय कधीही गांभीर्याने घेतला नाही. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर तिथे स्मारक बनवलं गेलं. मुंबईत ज्या इंदू मिलच्या जागेवर बाबासाहेबांचे स्मारक बनत आहे, ती जागा मोदी सरकारले महाराष्ट्र सरकारला दिली. त्यामुळे एवढी सगळी कामं करणारे नरेंद्र मोदी संविधान कसं बदलणार?” असा प्रश्नही त्यांनी उपस्थितांना विचारला.

हेही वाचा – “मोदींचा भटकत आहे महाराष्ट्रात आत्मा, कारण…” रामदास आठवलेंची कविता व्हायरल

“काँग्रेसकडून मोदींना बदनाम करण्याचा प्रयत्न”

“अनुसूचित जाती जमातीचं आरक्षण मोदी सरकार काढून घेईल, असा दावा राहुल गांधी यांच्याकडून करण्यात येतो आहे. मात्र, आरक्षणाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे, असं स्पष्टपणे पंतप्रधान मोदी आणि भाजपाने सांगितलं आहे. काँग्रेसकडून केवळ मोदी सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे”, असेही ते म्हणाले.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ramdas athawale reaction on congress allegation regarding changes in constitution in beed spb
Show comments