पुण्यातल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांचा उल्लेख अतृप्त आत्मा असा केला होता. त्यांनी शरद पवारांचं नाव न घेता त्यांच्यावर ही टीका केली होती. ज्यानंतर त्यांना त्याच शब्दांमध्ये उत्तर देण्यात आलं. महाराष्ट्रात एक वखवखलेला आत्माही फिरतो आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले. आता या सगळ्या प्रकरणी रामदास आठवलेंनी एक कविता केली आहे. जी चांगलीच चर्चेत आहे. इतकंच नाही जर लोकशाही धोक्यात असती तर मोदी मतं मागायला आले असते का? असाही प्रश्न रामदास आठवलेंनी विचारला.
काय म्हणाले रामदास आठवले?
“आपला देश संविधानानुसार चालतो. हे जर कुणाला मान्य नसेल, संविधान मान्य नसेल तर चलेजाव असे आम्ही सांगत आहोत. मी १७ राज्यांचा दौरा केला आहे. देशात वातावरण आमच्या बाजूने आहे. तामिळनाडूतही एनडीएच्या जागा येतील. तसंच उत्तर भारतातही जागा जिंकून येतील. आम्ही दिलेल्या नाऱ्याप्रमाणे ४०० जागा जिंकू जनतेचा आम्हाला कौल आहे” असं रामदास आठवलेंनी म्हटलं आहे.
आठवलेंची कविता
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे महाराष्ट्रात आत्मा.. कारण आम्हाला महाविकास आघाडीचा करायचा आहे खात्मा…” रामदास आठवले यांनी ही कविता केली. जी कविताही सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.
नरेंद्र मोदींचा वखवखलेला आत्मा भटकत आहे. असं संजय राऊत आणि उद्धव ठाकरे म्हणतात. त्यांना उद्धव ठाकरे यांनी केवळ आरोप करण्यासाठी ठेवले आहे. राज्याचा खेळ खंडोबा यांनी केला आहे. जे रोज म्हणत आहेत खोके-खोके, त्यांचे सरकले आहे डोके…, असं म्हणत आठवलेंनी राऊतांच्या टीकेलाही आठवलेंनी उत्तर दिलं आहे.
हे पण वाचा- उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला, “महाराष्ट्रात वखवखलेला आत्मा फिरतो आहे, कारण..”
पुणे जिल्ह्यातील चारही आणि मुंबईत सहा जागा महायुतीच जिंकेल. आम्ही मुळीच संविधान बदलणार नाही, गैरसमज पसरवू नका. मुस्लिम समाजातील लोकांनी देखील NDA ला पाठिंबा द्यावा. मला जरी तिकीट दिलेलं नाही, तरीही मी त्यांच्या बरोबर आहे. मी राज्यसभेवर आहे. पण आम्हाला एकतरी जागा मिळावी अशी अपेक्षा होती असंही आठवले म्हणाले आहेत.