Ramdas Kadam on Aditya Thackeray Dapoli Assembly constituency : शिवसेना (ठाकरे) आमदार व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी (१४ नोव्हेंबर) दापोली येथे शिवसेनेचे (ठाकरे ) विधानसभेचे उमेदवार संजय कदम यांच्या प्रचारार्थ आयोजित प्रचारसभेला संबोधित केलं. यावेळी आदित्य यांनी माजी पर्यावरण मंत्री व शिवसेना (शिंदे) नेते रामदास कदम, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यांवर सडकून टीका केली. रामदास कदमांबद्दल बोलताना आदित्य म्हणाले, “मी पक्षातील अनेकांना काका म्हणायचो. परंतु, त्यांनीच शिवसेनेशी गद्दारी केली. या लोकांना मत देऊन, निवडणुकीत जिंकवून तुम्हाला (जनतेला) राज्यात गुंडाराज आणायचं आहे का? गुंडांचं सरकार आणायचं आहे का? यांची गुंडगिरी व एकाधिकारशाही संपवली पाहिजे. कोणी गुंडगिरी करत असेल, धमकावत असेल, दादागिरी करत असेल, कोणी तुमच्यावर हात उचलत असेल तर थोडं थांबा, काळजी करू नका. आपण यांचा बंदोबस्त करू. लवकरच आपलं सरकार येतंय. त्या लोकांना बर्फाच्या लादीवर झोपवण्याची जबाबदारी माझी असेल”.
आदित्य ठाकरे यांच्या या वक्तव्यावर रामदास कदम यांनी जशास तसं प्रत्युत्तर दिलं आहे. कदम आदित्य ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत म्हणाले, “आदित्यला जनाची नाही, मनाची तरी लाज असती तर योगेश कदमला गद्दार म्हणण्याची त्याची हिंमत झाली नसती. योगेश आदित्यला त्याचा मित्र समजत होता. मात्र, तो काही वर्षांपूर्वी दापोलीत आला आणि त्याने योगेशच्या सर्व कार्यकर्त्यांची हकालपट्टी केली. दापोली नगरपरिषदेसाठी त्याने योगेशला एकही एबी फॉर्म दिला नाही. स्थानिक आमदाराला बाजूला ठेवलं. ही गद्दारी करताना तुला लाज वाटली नाही का?योगेशच्या पाठीत खंजिर खुपसताना तू गद्दारी केली नाहीस का?”
हे ही वाचा >> अजित पवारांचा शिंदेंना दम? शरद पवारांकडून भर सभेत मिमिक्री; म्हणाले, “शिंदेंनी मला विनंती केली, समजून घ्या…”
रामदास कदमांची आदित्य ठाकरेंवर टीका
रामदास कदम म्हणाले, “आदित्य मला काका.. काका… म्हणायचा. मात्र त्याचा बाप मुख्यमंत्री झाल्यावर त्याने या काकाला बाहेर ठेवलं. माझं पर्यावरण मंत्रीपद काढून घेतलं. या काकाच्या पाठीत खंजीर खुपसताना तुला लाज वाटली नाही का? त्यामुळे गद्दार कोण? तू बर्फाच्या लादीवर झोपवण्याच्या गोष्टी करतोस. तुझी लायकी आहे का हे सगळं बोलण्याची? तुझ्या बापाला जाऊन विचार, राज ठाकरे आणि नारायण राणे शिवसेनेतून बाहेर पडल्यावर तुझा बाप कारच्या पुढच्या सीटवर मला बसवल्याशिवाय मातोश्रीतून बाहेर पडत नव्हता. मी नसतो तर तुझ्या बापाची ** *** असती आणि तू मला लादीवर झोपवण्याच्या गोष्टी करतोस. मी गृहराज्यमंत्री होतो. पोलीस खातं मी सांभाळलं आहे. कोणाला कसे फटके द्यायचे, कोणाला लादीवर झोपवायचं हे सर्व मला माहिती आहे. तुला अजून खूप दिवस बघायचे आहेत, खूप पावसाळे काढायचे आहेत.