Rani Lanke : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाची उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत निलेश लंके यांना अजित पवारांची साथ सोडल्याचं डबल गिफ्ट मिळालं आहे. निलेश लंके यांना खासदारकीसाठी तिकिट दिल्यानंतर आता त्यांच्या पत्नीला म्हणजेच राणी लंकेंना पारनेरमधून विधानसभेची उमेदवारी देण्यात आली आहे.
जयंत पाटील यांनी काय म्हटलं आहे?
जयंत पाटील यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेऊन ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यामध्ये बारामतीमधून युगेंद्र पवार यांना उमेदवारी दिल्यामुळे आता बारामतीत काका विरुद्ध पुतण्या असा संघर्ष पुन्हा एकदा दिसणार आहे. तर मुक्ताईनगरमधून रोहिणी खडसे यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे. तर राष्ट्रवादीचे युवा नेते महेबुब शेख यांना बीड जिल्ह्यातील आष्टी मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. उरलेल्या मतदारांची यादी मुंबईत जाऊन जाहीर केली जाईल, असे जयंत पाटील यांनी सांगितले. काही जागांवर अद्यापही चर्चा सुरू आहे. त्यामुळे त्यांची नावे मुंबईतच जाहीर केले जाईल, असेही ते म्हणाले.
राणी लंके यांना पारनेरमधून तिकिट
लोकसभा निवडणुकीच्या वेळी अजित पवारांची साथ सोडून निलेश लंके शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सहभागी झाले. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली आणि त्यांनी सुजय विखे पाटील यांचा पराभव केला. लोकसभेत ते खासदार झाले. लोकसभेत त्यांनी घेतलेली इंग्रजी शपथही गाजली होती. आता त्यांनी हा निर्णय घेतल्याने त्यांना डबल गिफ्ट मिळालं आहे. कारण शरद पवारांनी राणी लंकेंना म्हणजेच निलेश लंकेच्या पत्नीला विधानसभेसाठी पारनेरमधून तिकिट दिलं आहे. अजित पवारांची साथ सोडल्याने हे गिफ्ट मिळाल्याची चर्चा रंगली आहे.
राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षातील पहिल्या यादीतली चर्चेतली नावं
उमेदवाराचं नाव | पक्ष | मतदारसंघ |
जयंत पाटील | राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) | इस्लामपूर |
अनिल देशमुख | राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) | काटोल |
राजेश टोपे | राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) | घनसावंगी |
जितेंद्र आव्हाड | राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) | कळवा, मुंब्रा |
हर्षवर्धन पाटील | राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) | इंदापूर |
रोहित पवार | राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) | कर्जत जामखेड |
तिन्ही पक्षांचं ८५ जागांवर एकमत
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील पुढे म्हणाले की, तीनही पक्षांनी प्रत्येकी ८५ जागांवर एकमत केले आहे. उरलेल्या जागांवर मित्रपक्षांशी चर्चा करून त्याही जागा लवकरच जाहीर केल्या जातील. तीनही पक्ष २७५ जागा लढविणार असून उरलेल्या जागा मित्रपक्षांना देण्यात येतील. तसेच मुंबईतील अणुशक्ती नगर हा नवाब मलिकांचा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात कुणाला उमेदवारी द्यायची, हा निर्णयही लवकरच घेतला जाईल, असेही ते म्हणाले.
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ४५ उमेदवारांची नावे जाहीर केली
इस्लामपूर – जयंत पाटील
काटोल – अनिल देशमुख
घनसावंगी – राजेश टोपे
कराड उत्तर – बाळासाहेब पाटील
मुंब्रा कळवा – जितेंद्र आव्हाड
कोरेगाव – शशिकांत शिंदे
वसमत – जयप्रकाश दांडेगावकर
जळगाव ग्रामीण – गुलाबराव देवकर
इंदापूर – हर्षवर्धन पाटील
राहुरी – प्राजक्त तनपुरे
शिरूर – अशोक पवार
शिराळा – मानसिंगराव नाईक
विक्रमगड – सुनील भुसारा
कर्जत जामखेड – रोहित पवार
अहमदपूर – विनायकराव पाटील
सिंदखेडराजा – डॉ. राजेंद्र शिंगणे
उदगीर – सुधाकर भालेराव
भोकरदन – चंद्रकांत दानवे
तुमसर – चरण वाघमारे
किनवट – प्रदीप नाईक
जिंतूर – विजय भांबळे
केज – पृथ्वीराज साठे
बेलापूर – संदीप नाईक
वडगाव शेरी – बापूसाहेब पठारे
जामनेर – दिलीप खोडपे
मुक्ताईनगर – रोहिणी खडसे
मुर्तिजापूर – सम्राट डोंगरदिवे
नागपूर पूर्व – दुनेश्वर पेठे
तिरोडा – रविकांत बोपचे
अहेरी – भाग्यश्री आत्राम
बदनापूर – रुपकुमार चौधरी
मुरबाड – सुभाष पवार
घाटकोपर पूर्व – राखी जाधव
आंबेगाव – देवदत्त निकम
बारामती – युगेंद्र पवार
कोपरगाव – संदीप वर्पे
शेवगाव – प्रताप ढाकणे
पारनेर – रानी लंके
आष्टी – महेबुब शेख
करमाळा – नारायण पाटील
सोलापूर उत्तर – महेश कोठे
चिपळून – प्रशांत यादव
कागल – समरजीत घाटगे
तासगाव-कवठे महांकाळ – रोहित पाटील
हडपसर – प्रशांत जगताप