Mahavikas Aghadi Maharashtra Assembly Election 2024 : ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. क्रांतीकारी शेतकरी संघटना महाविकास आघाडीबरोबर हातमिळवणी करून विधानसभा निवडणूक लढणार असल्याची चर्चा असतानाच या संघटनेने वेगळी वाट निवडली आहे. बुलढाण्यासह आसपासच्या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांमध्ये ही संघटना लोकप्रिय आहे. रवीकांत तुपकर हे या संघटनेचे प्रमुख आहेत. राज्यात शेतकरी चळवळ पुढे नेण्यासाठी तसेच जनसामान्यांच्या समस्यांवर आवाज उठवण्यासाठी तुपकरांनी बिगर राजकीय सामाजिक संघटनेची स्थापना केली होती. मात्र अलीकडच्या काळात त्यांच्या या संघटनेने राजकीय पावलं टाकण्यास सुरुवात केली होती. स्वतः रवीकांत तुपकर या संघटनेच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीला उभे राहिले होते.
“महाविकास आघाडीने चर्चा करुन खेळवले आणि नंतर दगाफटका केला, त्यामुळे महाविकास आघाडीबरोबर क्रांतिकारी शेतकरी संघटना जाणार नाही”, असं रविकांत तुपकर यांनी जाहीर केलं आहे. ते म्हणाले, “महाविकास आघाडीने शेतकऱ्यांचा अपमान केला आहे, कदाचित त्यांना शेतकऱ्यांच्या मतांची गरज नसावी. महाराष्ट्रात क्रांतिकारी शेतकरी संघटना ताकदीने उभी राहील. या राज्यात काही ठिकाणी शेतकरी पुत्र अपक्ष लढणार आहेत, आम्ही त्यांचा प्रचार करणार आहोत”. यासंदर्भात रविकांत तुपकर यांनी आज क्रांतीकारी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची व इतर शेतकरी नेत्यांची महत्त्वाची बैठकी बोलवली होती. या बैठकीत त्यांनी विधानसभा निवडणूक लढण्याबाबत चर्चा केली. निवडणूक लढवायची की नाही याबाबतचा निर्णय २९ ऑक्टोबर रोजी घेऊ असंही त्यांनी बैठकीनंतर सांगितलं.
हे ही वाचा >> मतविभाजनाचा फटका बसलेले पांडव पुन्हा मतेंशी भिडणार
तुपकरांची बुलढाण्यात ताकद
रवीकांत तुपकरांना अपेक्षा होती की महाविकास आघाडीच्या जागावाटपात त्यांच्या संघटनेला काही जागा मिळतील. बुलढाणा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी यासाठी ते स्वतः प्रयत्नशील होते. त्यांना मविआकडून उमेदवारी मिळेल असं बोललं जात होतं. मात्र, त्यांना उमेदवारी मिळालेली नाही. त्यामुळे त्यांनी वेगळी वाट निवडली आहे. दरम्यान, आगामी काळात रवीकांत तुपकर महाराष्ट्र दौरा करणार असून राज्यात २५ उमेदवार उभे करण्याची तयारी करत असल्याचं सांगितलं जात आहे. बुलढाणा मतदारसंघातून रवीकांत तुपकरांनी लोकसभा निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. मात्र त्यांना तब्बल अडीच लाख मतं मिळाली होती. मतांचं विभाजन होऊ नये म्हणून महाविकास आघाडी तुपकरांना आपल्याबरोबर घेण्याच्या विचारात होती. मात्र, त्यांच्यातील चर्चा फिस्कटल्याचं चित्र दिसत आहे.
हे ही वाचा >> परतूरमध्ये काँग्रेसला धक्का; मतदार संघ शिवसेनेकडे
तुपकरांची वाट वेगळी
रवीकांत तुपकर हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून बाहेर पडल्यानंतर शेतकरी चळवळ पुढे नेण्यासाठी आपली वेगळी अशी स्वतंत्र संघटना असावी, अशी मागणी राज्यभरातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली होती. त्याला अनुसरुन रविकांत तुपकरांनी सर्वांशी चर्चा केली. चर्चेअंती स्वतंत्र संघटना स्थापन करण्याचा निर्णय घेतला. अखेर रविकांत तुपकरांनी क्रांतिकारी शेतकरी संघटनेची घोषणा केली आहे. ही संघटना मविआबरोबर विधानसभा निवडणूक लढवेल असं बोललं जात होतं. मात्र आता त्यांनी वेगळी वाट निवडली आहे.
ॉ