गुजरात विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने राजकीय वातावरण सध्या तापू लागल्याचं पाहायला मिळत आहे. यंदा आम आदमी पक्ष गुजरातमध्ये निवडणूक जिंकणार असल्याचं अरविंद केजरीवाल यांनी लिहून दिल्यानंतर तर निवडणुकीला आणखीन रंगत आली आहे. भाजपानं आपला गड राखण्यासाठी ताकद पणाला लावली असून काँग्रेसनं भाजपाला पराभूत करण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. क्रिकेटपटू रवींद्र जाडेजाची पत्नी रिवाबा जाडेजाला भाजपानं जामनगर उत्तर मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. सध्या रवींद्र जाडेजा त्याच्या पत्नीच्या प्रचारासाठी जामनगरमध्ये फिरत असताना त्याच्या वडिलांनी मात्र काँग्रेससाठी मत देण्याचं आवाहन केलं आहे. त्यामुळे हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
रवींद्र जाडेजाची पत्नी रिवाबा जाडेजाला भाजपानं उमेदवारी जाहीर केल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. जामनगरमधील विद्यमान आमदारांना तिकीट नाकारून भाजपानं रिवाबाला उमेदवारी दिली. याच सीटवरून काँग्रेसमध्ये असणारी जाडेजाची बहीणही इच्छुक होती, मात्र रिवाबाच्या उमेदवारीनंतर तिला तिकीट नाकारण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, आता रवींद्र जाडेजाच्या वडिलांचा काँग्रेससाठी मत देण्याचं आवाहन करणारा व्हिडीओ सध्या व्हायरल होत असल्यामुळे नवी चर्चा सुरू झाली आहे.
Gujarat Elections: रवींद्र जडेजाच्या पत्नीला भाजपाचं तिकीट; गुजरात निवडणुकीतून राजकीय पदार्पण!
काय आहे या व्हिडीओमध्ये?
रवींद्र जाडेजाचे वडील अनिरुद्धसिंह जाडेजा यांनी मतदान करण्याचं आवाहन करणारा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ते काँग्रेसचे उमेदवार बिपेंद्रसिंह जाडेजा यांना मतदान करण्याचं आवाहन करत असल्याचं दिसत आहे.
“मी अनिरुद्धसिंह जाडेजा काँग्रेस उमेदवार बिपेंद्रसिंह जाडेजा यांना मतदान करण्याचं आवाहन तुम्हा सर्वांना करतो आहे. बिपेंद्रसिंह जाडेजा हे माझ्या लहान भावासारखे आहेत. विशेषत: राजपूत मतदारांनी बिपेंद्रसिंह यांना मतदान करावं अशी मी विनंती करतो”, असं ते व्हिडीओमध्ये म्हणताना दिसत आहेत.
जामनगर उत्तर हा सुरुवातीपासूनच भाजपाचा बालेकिल्ला राहिलेला आहे. धर्मेंद्रसिंह जाडेजा हे सध्या जामनगर उत्तरमधले भाजपाचे विद्यमान आमदार आहेत. त्यांच्याजागी रिवाबा जाडेजाला उमेदवारी देण्यात आली आहे.