सध्या देशात चर्चा आहे ती टी-२० क्रिकेट वर्ल्डकपची! या वर्ल्डकपमध्ये भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा दुखापतीमुळे खेळू शकला नाही. मात्र, असं असलं, तरी आता रवींद्र जडेजा दुसऱ्या एका कारणामुळे चर्चेत आला आहे. रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा हिला भाजपानं गुजरात विधानसभा निवडणुकीत तिकीट दिलं आहे. त्यामुळे रिवाबा जडेजा या निवडणुकीच्या माध्यमातून राजकीय विश्वात पदार्पण करणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. विशेष म्हणजे भाजपानं विद्यमान आमदाराला टाळून रिवाबाला निवडणुकीचं तिकीट दिल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
भाजपाचा हक्काचा मतदारसंघ!
रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा हिला भाजपा तिकीट देणार असल्याची चर्चा गेल्या दोन दिवसांपासून सुरू होती. अखेर ही चर्चा खरी ठरली असून आज रिवाबाच्या तिकिटाची घोषणा भाजपाकडून करण्यात आली आहे. आगामी निवडणुकीत जामनगर उत्तर या मतदारसंघातून रिवाबा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. त्यामुळे साहजिकच पत्नीसाठी खुद्द रवींद्र जडेजाही भाजपाचा प्रचार करताना आगामी काळात दिसण्याची शक्यता आहे.
जामनगर उत्तर हा भाजपाचा हक्काचा मतदारसंघ राहिला आहे. धर्मेंद्रसिंह जडेजा हे सध्या जामनगर उत्तर या मतदारसंघातून भाजपाचे आमदार आहेत. मात्र, विद्यमान आमदारांना नाकारून भाजपानं नवख्या रिवाबा जडेजा यांच्यावर भरवसा दाखवला आहे. त्यामुळे स्थानिक वर्तुळात भाजपा पदाधिकाऱ्यांच्या नाराजीचीही चर्चा रंगली आहे.