लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडलं असून काही तासांनी दुसऱ्या टप्प्यातील मतदान होईल. निवडूक संपायला आता केवळ काही दिवस बाकी आहेत. असं असूनही नेहरू-गांधी कुटुंबाचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेठी मतदारसंघात काँग्रेसने अद्याप उमेदवार दिलेला नाही. काँग्रेसकडून अमेठीतून लोकसभा निवडणूक कोण लढवणार याचा निर्णय अद्याप झालेला नाही. अशातच अमेठीत रॉबर्ट वाड्रांचे पोस्टर झळकले आहेत. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांचे पती आणि व्यावसायिक रॉबर्ट वॉड्रा अमेठीतून लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छूक असून काँग्रेस कार्यकर्त्यांनी अमेठीत त्यांच्या प्रचाराला सुरुवात केली आहे.

अमेठीतल्या गौरीगंजमध्ये काँग्रेस कार्यालयाच्या बाहेर लावण्यात आलेल्या पोस्टर्सवर ‘अमेठी की जनता करे पुकार, रॉबर्ट वाड्रा अब की बार’ अशा घोषणा लिहिल्या आहेत. काही दिवसांपूर्वी रॉबर्ट वाड्रा यांना प्रसारमाध्यमांनी अमेठीतून लोकसभा निवडणूक लढण्याबाबत प्रश्न विचारला तेव्हा रॉबर्ट वाड्रा म्हणाले की अमेठीतील जनतेची इच्छा आहे की मी त्यांचं प्रतिनिधित्व करावं. काँग्रेसचा अमेठी लोकसभेचा उमेदवार कोण असेल याबाबत योग्य वेळी निर्णय घेतला जाईल.

राजकारणात पाऊल ठेवण्याचे संकेत देताना रॉबर्ट वाड्रा म्हणाले होते की, देशात आता बदलाचे वारे वाहू लागले आहेत. आमचं संपूर्ण कुटुंब सध्या यासाठी काम करतंय. मी राजकारणाच्या मैदानात उतरलो किंवा नाही उतरलो तरी मी लोकांसाठी माझं काम करणं चालूच ठेवणार आहे. आपल्याला देशात एक धर्मनिरपेक्ष सरकार स्थापन करायचं आहे. त्यासाठीचे आमचे प्रयत्न चालू राहतील. अमेठीच्या रहिवाशांना वाटतं की, मी त्यांचं नेतृत्व करावं. मी मतदारसंघात फिरावं, त्यांच्या समस्या ऐकाव्या जेणेकरून मला त्या समस्या दूर करता येतील आणि मतदारसंघाचा लोकांच्या अपेक्षेप्रमाणे विकास करता येईल. मला राजकारणात यायचं आहे. मात्र त्याबाबतचा निर्णय योग्य वेळी घेतला जाईल. मला राजकारणात येण्याची घाई नाही.

हे ही वाचा >> “…म्हणून शरद पवार तुम्हाला भाजपाशी चर्चा करायला सांगायचे”, जितेंद्र आव्हाडांचा तटकरेंना टोला

“अमेठीवर राहुल गांधींच्या दाजींची नजर”

दरम्यान, रॉबर्ट वाड्रांच्या उमेदवारीवरून अमेठीच्या विद्यमान खासदार स्मृती इराणी यांनी राहुल गांधी (अमेठीचे माजी खासदार) आणि काँग्रेसला टोला लगावला आहे. स्मृती इराणी अमेठीतील एका प्रचारसभेत म्हणाल्या अमेठीच्या जागेवर दाजींची (राहुल गांधींचे दाजी रॉबर्ट वाड्रा) नजर आहे, त्यामुळे आता मेहुणे (राहुल गांधी) काय करणार? पूर्वी लोक बसमधून प्रवास करताना बसमधील सीटवर दावा करण्यासाठी त्या सीटवर रुमाल ठेवायचे जेणेकरून तिथे दुसरा कोणी बसू नये. त्यामुळे आता राहुल गांधीदेखील रुमाल घेऊन या जागेवर दावा करण्यासाठी येतील. कारण या जागेवर त्यांच्या दाजींची नजर आहे

Story img Loader