Rohit Pawar : महाराष्ट्रात महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं आहे. मात्र महायुतीचा मुख्यमंत्री कोण होणार? याचा पेच पाच दिवसांत संपलेला नाही. मुख्यमंत्रिपदावर एकनाथ शिंदे यांनी दावा सांगितल्याच्या बातम्या बुधवारपर्यंत समोर येत होत्या. शिवसेनेच्या नेत्यांनी एकनाथ शिंदेंनाच मुख्यमंत्री करावं कारण त्यांच्या नेतृत्वात महायुतीला प्रचंड यश मिळालं आहे त्यामुळे महाराष्ट्रात बिहार पॅटर्न राबवावा असंही एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील नेत्यांनी म्हटलं होतं. मात्र एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. यानंतर आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) यांनी एक महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.
काय म्हणाले एकनाथ शिंदे?
लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख मला कुठल्याही पदापेक्षा मोठी आहे. नरेंद्र मोदी, अमित शाह यांचा निर्णय मला मान्य आहे. मी कुठलाही अडसर नसेन. भाजपाला जो मुख्यमंत्री निवडायचा आहे तो त्यांनी निवडावा. आमचा शिवसेना म्हणून त्या नावाला पाठिंबा असणार आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी काय निर्णय घ्यायचा तो घ्यावा असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. तसंच अडीच वर्षे मुख्यमंत्री म्हणून सेवा करण्याची जी संधी मिळाली त्याबद्दल त्यांनी मोदी शाह यांचे आभार मानले आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री या पदाच्या रेसमधून बाहेर पडले आहेत अशा चर्चा रंगल्या आहेत. दरम्यान शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी एक महत्त्वाचा दावा केला आहे.
हे पण वाचा- Rohit Pawar : “अजित पवार मुख्यमंत्री झाले तर मी स्वतः…”, मुख्यमंत्रिपदावरून रोहित पवारांचं मोठं विधान
काय म्हणाले रोहित पवार?
“गेल्या काही दिवसांपासून मी हेच पोस्ट करतो आहे की महाराष्ट्राची लोकशाही गुजरातच्या ईव्हीएमच्या विळख्यात अडकते की काय? महाराष्ट्राच्या जनतेला हा प्रश्न पडला आहे. मी लोकांमधली चर्चा अजून लोकांपर्यंत सोशल मीडियापर्यंत घेऊन चाललो आहे. जो निकाल लागला आहे तो लोकांना मान्य आहे का? असं विचारलं तर लोक म्हणतात काहीतरी गडबड आहे.” असं रोहित पवार ( Rohit Pawar ) म्हणाले.
एकनाथ शिंदेंबाबत रोहित पवार यांनी काय म्हटलं आहे?
रोहित पवार ( Rohit Pawar ) पुढे म्हणाले, “विषय एवढंच आहे की महाराष्ट्र देशातलं सर्वात विकसित राज्य आहे. पण आता विकास कमी झाला आहे. कारण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार हा निर्णय दिल्लीत घेतला जातो आहे. पूर्ण बहुमत असताना दिल्लीत तीन-चार दिवस जाऊन बसावं लागतं आहे. भाजपाचा मुख्यमंत्री राज्यात होईल. मला आधी वाटत होतं की एकनाथ शिंदेंना संधी दिली वर्षभरासाठी तरी दिली जाईल. पण ठाण्यातली पत्रकार परिषद मी पाहिली त्यात एकनाथ शिंदेंनी देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेतलं नाही. अजित पवारांचं नाव घेतलं गेलं नाही. मोदी आणि अमित शाह हे नाव घेतलं गेलं. त्यामुळे एकनाथ शिंदे हे केंद्रात मुख्यमंत्री होईल आणि त्यांच्या मुलाला इथे उपमुख्यमंत्रीपद दिलं जाईल. पण देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होती की आणखी कोणी? हे काही सांगता येत नाही.” असं रोहित पवार ( Rohit Pawar ) यांनी म्हटलं आहे.