बारामती लोकसभा मतदारसंघात मतदानाच्या पूर्वसंध्येला मतदारांमध्ये पैशांचं वाटप झाल्याचा आरोप होत आहे. शरद पवार गटातील आमदार आणि नेत्यांनी हा आरोप केला आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटाने मतदारांना पैसे वाटले आहेत असं म्हणत शरद पवार गटाचे बारामतीचे शहराध्यक्ष संदीप गुजर आणि युवक अध्यक्ष सत्यव्रत काळे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तसेच या प्रकरणी कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनीदेखील अजित पवार गटावर टीका केली आहे. पाठोपाठ रोहित पवार यांनी काही व्हिडीओ शेअर केले आहेत. बारामतीत पोलीस बंदोबस्तात पैसेवाटप होत असल्याचा दावा करत रोहित पवारांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर चार व्हिडीओ शेअर केले आहेत. तसेच बारामतीत रात्री १२ नंतरही बँकेचं कामकाज चालू असल्याचा एक व्हिडीओ रोहित पवार यांनी शेअर केला आहे.

रोहित पवारांनी शेअर केलेल्या व्हिडीओत राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातील आणि शरद पवार गटातील कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची चालू असल्याचं पाहायला मिळत आहे. तिथे पोलीसही उपस्थित असल्याच दिसत आहे. एका कारमध्ये ठेवलेले पैसेदेखील व्हिडीओत दिसत आहेत. हे व्हिडीओ शेअर करत रोहित पवार यांनी म्हटलं आहे की, बारामती मतदारसंघात चक्क पोलिस ‘बंदोबस्तात’ पडतोय पैशांचा पाऊस… यासंदर्भात भोर तालुक्यातील काही व्हिडीओ शेअर करतोय… यामध्ये भोर तालुक्यातील ‘अजितदादा मित्रमंडळा’चा पदाधिकारी आणि मावळमधील एका नेत्याचे कार्यकर्तेही दिसत आहेत. यासाठीच पाहीजे होती का ‘Y’ दर्जाची सुरक्षा?

अजित पवार यांचे पुत्र आणि २०१९ च्या मावळच्या लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले पार्थ पवार यांना अलीकडेच गृहमंत्रालयाने वाय दर्जाची सुरुक्षा दिली आहे. पार्थ पवार गेल्या काही महिन्यांपासून मावळमध्ये पक्षाची मोर्चेबांधणी करत आहेत. रोहित पवारांनी मावळमधील नेते आणि वाय प्लस दर्जाची सुरक्षा असा उल्लेख करून पार्थ पवारांवर निशाणा साधला असल्याची चर्चा आहे.

हे ही वाचा >> “मला उद्ध्वस्त करण्यासाठी…”, ‘त्या’ आंदोलनाचा उल्लेख करत फडणवीसांचा शरद पवारांवर गंभीर आरोप

दरम्यान, रोहित पवार यांनी बारामतीतल्या वेल्हे येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं कामकाज रात्री १२ वाजले तरी चालू असल्याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. रोहित पवार यांनी बँकेचेही व्हिडीओ एक्सवर शेअर केले आहेत. तसेच त्यांनी म्हटलं आहे की, पीडीसीसी बँकेच्या वेल्हे शाखेतील घड्याळ बहुतेक बंद पडलंय. रात्रीचे १२ वाजले तरी बँक चालू आहे. कदाचित उद्या मतदानामुळे आज रात्रभर ओव्हर टाईम चालू असावा.