रोहित पवार यांच्या जिल्हा परिषद निवडणूक लढवण्याला शरद पवारांचा विरोध होता. मात्र मी हट्टाने रोहितला एबी फॉर्म (पक्षाकडून दिला जाणारा उमेदवारी अर्ज) दिला आणि त्याला तिथून निवडून आणलं, असा दावा उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते अजित पवार यांनी केला आहे. अजित पवारांच्या या दाव्यावर आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, अजित पवारांनी अर्धसत्य सांगितलं आहे. शरद पवारांचा माझ्या उमेदवारीला विरोध नव्हता तर त्यांच्या मते मी विधानसभा किंवा लोकसभा निवडणूक लढवायला हवी होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बारामतीमधील प्रचारसभेत अजित पवार म्हणाले होते की, २०१७ ला माझे थोरले बंधू राजेंद्र पवार (रोहित पवार यांचे वडील) मला म्हणाले, माझ्या रोहितला जिल्हा परिषदेचा सदस्य केलं पाहिजे. त्यावर मी कोणत्या गटातून रोहितला उमेदवारी द्यावी याबाबत विचार केला. मी गुणवडी आणि शिरसुपळगट निवडला आणि शरद पवार यांना फोन केला. त्यांना सांगितलं की आपल्या रोहितला जिल्हा परिषद लढवायची आहे आणि मी त्याच्यासाठी या गटाची निवड केली आहे. त्यावर शरद पवार मला म्हणाले, अजिबात नाही. इतरांनी राजकारणात यायचं नाही. त्यांना म्हणावं, धंदापाणी करा, बरामती अ‍ॅग्रो बघा. मी शरद पवारांना म्हटलं, की त्याचे वडील फार आग्रह करत आहेत आणि रोहितदेखील आग्रही आहे. त्यावर शरद पवार मला म्हणाले, मी सांगतोय ना… नाही… आणि पुढच्या क्षणी त्यांनी फोन ठेवला.

अजित पवार म्हणाले, त्या दिवशी मी रात्री राजेंद्र पवारांकडे गेलो. तेव्हा मला गावातील एकाने सांगितलं की, त्यांनी निवडणूक अपक्ष लढवण्याचा निर्णय घेतला आहे आणि उमेदवारी अर्जदेखील घेतला आहे. त्यानंतर मी शरद पवारांना न सांगता परस्पर रोहित पवारांना एबी फॉर्म दिला. त्यावर शरद पवार म्हणाले, सगळे पवार एकाच जिल्ह्यात असतील तर लोक काय म्हणतील, यांना पवारांशिवाय दुसरं कोणी दिसत नाही का? असा प्रश्न उपस्थित करतील. त्यानंतर मला शरद पवारांनी सांगितलं तिकडे कर्ज जामखेड हा दुष्काळी भाग आहे. तिथे मी काम केलं आहे, तिकडे उमेदवारी द्या. त्यानुसार मी रोहित पवारांना तिथे उमेदवारी दिली.

हे ही वाचा >> “विशाल पाटलांना कोणीतरी फूस लावतंय”, नाना पटोलेंचा रोख कोणाकडे?

अजित पवारांच्या या दाव्यावर रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रोहित पवार म्हणाले, अजित पवार यांनी अर्थवट माहिती दिली आहे. मला जिल्हा परिषदेची निवडणूक लढायची होती. त्यामुळे मी अजित पवार आणि शरद पवार या दोघांशी बोललो होतो. मात्र शरद पवार यांचं मत होतं की, मी आमदारकीचा किंवा खासदारकीचा विचार केला तर ते जास्त योग्य ठरेल. मात्र मी म्हटलं की लहान पदापासून सुरुवात करेन. त्यानंतर अजित पवार यांनी मला एबी फॉर्म दिला. कारण महत्त्वाची तिकीटं अजित पवारच देत होते. शरद पवार यांनी तेवढे अधिकार अजित पवार यांना दिले होते. तसेच त्यांचा अजित पवारांवर तेवढा विश्वास आणि प्रेमही होतं. त्यानंतर मला एबी फॉर्म मिळाला आणि मी निवडणूक लढवली. राहिला प्रश्न अपक्ष निवडणूक लढवण्याचा तर त्यावर मी एवढंच सांगेन की अजित पवार खोटं बोलत आहेत.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rohit pawar says sharad pawar didnt opposed my candidature ajit pawar is lying asc