Maharashtra Assembly Election 2024 Bhiwandi East constituency : भिवंडी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी अडचणीत आली आहे. कारण, येथील शिवसेनेचे (ठाकरे) नेते व माजी आमदार रुपेश म्हात्रे यांनी मविआच्या उमेदवाराविरोधात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मविआच्या जागावाटपात ही जागा समाजवादी पार्टीला मिळाली असून सपाचे विद्यमान आमदार रईस शेख यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे रुपेश म्हात्रे व भिवंडीतील शिवसैनिकांनी बंडाचं निशाण फडकावलं आहे. दरम्यान, म्हात्रे यांनी शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. म्हात्रे म्हणाले, वांद्रे (पूर्व) व वरळीत शिवसेनेला (ठाकरे) मदत व्हावी यासाठी उद्धव ठाकरे यांनी भिवंडीत समाजवादी पार्टीबरोबर तडजोडी केल्या आहेत.
रुपेश म्हात्रे म्हणाले, “अडीच वर्षांपूर्वी आमच्या पक्षात बंडखोरी झाली पक्षाचे दोन गट पडले त्यानंतरही आम्ही भिवंडीमध्ये पक्ष एकसंध ठेवण्याचा प्रयत्न केला पक्षाची एकजूट ठेवण्यासाठी जे जे करावं लागलं ते सगळं मी केलं. लोकसभा निवडणुकीपूर्वी पक्षाला वेगळी उभारी देऊन पक्षाची ताकद वाढवली. लोकसभेची जागा आम्हाला मिळावी इतकी ताकद निर्माण केली मात्र लोकसभेला आमच्यावर अन्याय झाला ती जागा आम्हाला दिली नाही. मात्र आम्ही महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी काम केलं आता विधानसभा निवडणुकीतही आमच्यावर अन्याय केला जातो. म्हणजेच पक्षाशी एकनिष्ठ राहून आम्ही घोडचूक केली का? असा प्रश्न आम्हाला पडला आहे”.
हे ही वाचा >> “जी व्यक्ती जाऊन ९ वर्षं झाली…”, शरद पवारांची आर. आर. पाटलांबाबत अजित पवारांनी केलेल्या विधानावर नाराजी!
माजी आमदार रुपेश म्हात्रे काय म्हणाले?
माजी आमदार म्हात्रे म्हणाले, “२०१४ च्या निवडणुकीतही आमच्यावर अन्याय झाला. आत्ताचे मुख्यमंत्री व तेव्हाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुलाला कल्याण डोंबिवलीत निवडून आणण्यासाठी आम्हाला भिवंडीत कपिल पाटलांचं काम करावं लागलं आणि आताही आम्हाला तेच करावं लागतंय. तिकडे वांद्रे आणि वरळीत शिवसेनेला (ठाकरे) मदत व्हावी यासाठी भिवंडीत मुस्लिम उमेदवार दिला जातो. समाजवादी पक्षाने त्यांचा उमेदवार दिला आहे. आम्हाला त्यांचं काम करायचं आहे. याचाच अर्थ त्यांच्या (उद्धव ठाकरे) राजकारणासाठी प्रत्येक वेळी आमचा बळी देण्याचं राजकारण केलं जात आहे”.
हे ही वाचा >> “बाळासाहेबांनी कधीच निवडणूक लढविली नव्हती, राज ठाकरेंनी…”, माहीम विधानसभेबाबत सदा सरवणकर काय म्हणाले?
म्हात्रे म्हणाले, “शिवसेना पक्ष नेहमीच भिवंडीला सवतीच्या मुलासारखी वागणूक देत आहे. कुठेही तडजोड करायची असते तेव्हा भिवंडीचा बळी दिला जातो. एकनाथ शिंदे यांनी देखील हेच केलं आणि आता उद्धव ठाकरे देखील तेच करत आहेत. भिवंडीला नेहमीच नकारात्मक दृष्टिकोनातून पाहिलं जात आहे. भिवंडीची जनता या सर्व पक्षांना एक दिवस आपली ताकद दाखवेल. कारण आम्हाला प्रत्येक वेळी गृहीत धरलं जातंय. हे चुकीचं आहे. कुठल्याही पक्षाने, नेत्याने आम्हाला गृहीत धरू नये, असा संदेश आता आम्हाला द्यायचा आहे”.