राजस्थानमध्ये यावेळीही सत्तांतराची परंपरा कायम राहिली आहे. येथे काँग्रेसला आपली सत्ता गमवावी लागली असून, भाजपाने स्पष्ट बहुमत प्राप्त केले आहे. काँग्रेस पक्षाला अंतर्गत नाराजीचा फटका बसल्याचा दावा राजकीय तज्ज्ञ करीत आहेत. यावरच आता काँग्रेसचे वरिष्ठ नेते तथा राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी काँग्रेसच्या पराभवावर भाष्य केले. आम्हाला आत्मचिंतन, तसेच आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. ते टोंक येथे माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.
“आम्ही पूर्ण ताकदीने प्रयत्न केला; मात्र…”
“राज्यातील सत्तांतराची परंपरा मोडीत काढण्यासाठी आम्ही पूर्ण ताकदीने प्रयत्न केला; मात्र आम्हाला त्यात यश आले नाही. ही निश्चितच चिंतेची बाब आहे. आम्ही जेव्हा जेव्हा सत्ता स्थापन केलेली आहे, त्याच्या पाच वर्षांनंतर आम्ही पुन्हा निवडून येऊ शकलेलो नाही. यावेळीदेखील आम्ही पराभूत झालो,” असे सचिन पायलट म्हणाले. मुख्यमंत्री असताना अशोक गेहलोत हे २००३, २०१३ व आता २०२३ मध्ये निवडणूक जिंकू शकलेले नाहीत.
“… याचे उत्तर आम्हाला शोधावे लागेल”
“पुन्हा सत्तेत येणं हे आमच्या सर्वांचंच स्वप्न होतं. मात्र, आता आम्ही प्रामाणिकपणे आत्मचिंतन करायला हवं. आम्ही आमच्या या पराभवावर निश्चितच विचार करू. आमचा पराभव नेमका का झाला, याचं उत्तर आम्हाला शोधावं लागेल. आम्ही सत्तेत न येण्याची वेगवेगळी कारणं आहेत,” असेही सचिन पायलट म्हणाले.
“काँग्रेस पक्ष विचार करील अशी मला अपेक्षा”
काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर अशोक गेहलोत यांचे ओएसडी लोकेश शर्मा यांनी आपली भूमिका मांडली होती. त्यांनी या पराभवासाठी अशोक गेहलोत जबाबदार आहेत, असा दावा केला होता. त्यावरही सचिन पायलट यांनी प्रतिक्रिया दिली. “मी लोकेश शर्मा यांचं विधान ऐकलं आहे. त्यांनी केलेलं हे विधान आश्चर्यकारक आहे. कारण- ते अशोक गेहलोत यांचे ओएसडी होते. त्यांचं विधान हा चिंतेचा विषय ठरतो. शर्मा यांनी हे विधान का केलं, याचा काँग्रेस पक्ष विचार करील, अशी मला अपेक्षा आहे,” असे सचिन पायलट म्हणाले.
लोकेश शर्मा नेमके काय म्हणाले होते?
काँग्रेसच्या पराभवानंतर लोकेश शर्मा यांनी अशोक गेहलोत यांच्यावर टीका केली होती. काँग्रेसच्या पराभवासाठी फक्त अशोक गेहलोत जबाबदार आहेत, असे ते म्हणाले. “लोकशाहीत जनताच मायबाप आहे आणि जनादेश शिरसावंद्य आहे. तो विनम्रतेनं आम्ही स्वीकारत आहोत. मला या निकालांमुळे वाईट तर नक्कीच वाटलं आहे; पण आश्चर्य वाटलेलं नाही. काँग्रेस पक्ष राजस्थानमध्ये नक्कीच परंपरा बदलू शकत होता; पण अशोक गेहलोत यांना कधीच कुठला बदल नको होता. त्यामुळे हा काँग्रेस पक्षाचा नाही, तर अशोक गहलोत यांचा पराभव आहे. गेहलोत यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षानं निवडणुका लढवल्या. गेहलोत यांना असे वाटत होते की, प्रत्येक जागेवर ते स्वत:च निवडणूक लढवीत आहेत. पण, या निवडणुकीत ना त्यांचा अनुभव कामी आला, ना जादू”, असे लोकेश शर्मा यांनी पोस्टमध्ये नमूद केले.
“मनमानी पद्धतीनं…”
“सलग तिसऱ्यांदा गेहलोत यांनी मुख्यमंत्री असूनही पक्षाला काठावर आणून सोडलं आहे. आजपर्यंत त्यांनी पक्षाकडून फक्त घेतलं आहे; पण ते सत्तेत असताना कधीच पक्षाला पुन्हा सत्ता मिळवून देऊ शकलेले नाहीत. पक्षातील हायकमांडला फसवून, त्यांच्यापर्यंत खरी माहिती पोहोचू न देता, दुसरा कुठलाही पर्याय उभा राहू न देणं, स्वार्थी लोकांमध्येच राहून सातत्यानं चुकीचे आणि गडबडीत निर्णय घेणं, सर्व प्रकारच्या अंदाजांकडे दुर्लक्ष करून मनमानी पद्धतीनं आणि आपल्या आवडत्या उमेदवारांनाच त्यांचा पराभव स्पष्ट दिसत असूनही तिकीट देण्याचा हट्ट करणं अशा गोष्टी पराभवासाठी कारणीभूत ठरल्या”, असेही शर्मा यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
भाजपाचा ११५; तर काँग्रेसचा ६९ जागांवर विजय
दरम्यान, या विधानसभा निवडणुकीत एकूण १९९ जागांपैकी काँग्रेसला फक्त ६९ जागा जिंकता आल्या; तर भाजपाने तब्बल ११५ जागांवर विजय मिळवला आहे. बहुमताचा आकडा पार केल्यामुळे भाजपाचा सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे.