काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी आज (३१ ऑक्टोबर) राजस्थानच्या टोंक विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. पायलट यांनी निवडणुकीसाठी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रतिज्ञापत्रात पायलट यांनी स्वतःला घटस्फोटित घोषित केलं आहे. त्यांच्या प्रतिज्ञापत्रात पत्नीच्या नावासमोर घटस्फोटित असं लिहिलं आहे. २०१८ च्या विधानसभा निवडणुकीसाठी पायलट यांनी दाखल केलेल्या शपथपत्रात पत्नीचा उल्लेख केला होता. तसेच त्यांच्या पत्नीकडे असलेल्या संपत्तीचाही खुलासा केला होता. परंतु, पायलट यांनी यंदा दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात ते घटस्फोटित असल्याचं नमूद केलं आहे.

सचिन पायलट यांनी जम्मू काश्मीरचे दिग्गज नेते आणि माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांची मुलगी सारा यांच्याशी लग्न केलं होतं. जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला हे त्यांची थोरले बंधू आहेत. सचिन आणि सारा यांना आरन आणि विहान अशी दोन मुलं आहेत. ही दोन्ही मुलं आपल्यावर अवलंबून असल्याचा उल्लेख पायलट यांनी प्रतिज्ञापत्रात केला आहे.

सचिन आणि सारा यांनी २००४ मध्ये लग्न केलं होतं. या लग्नाला दोघांनी खूप कमी लोकांना आमंत्रित केलं होतं. त्या काळात या लग्नाची देशभर खूप चर्चादेखील झाली होती. सचिन आणि सारा पायलट हे दोघेही विभक्त झाल्याची चर्चा यापूर्वीही झाली आहे. २०१४ मध्ये या दोघांनी घटस्फोट घेतल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. परंतु, पायलट दाप्मत्याने या सर्व अफवा असल्याचं त्यावेळी म्हटलं होतं.

हे ही वाचा >> “राज्य पुरस्कृत हल्लेखोर तुमचा फोन हॅक…”, अ‍ॅपलकडून महुआ मोईत्रा, शशी थरूर यांना इशारा!

दरम्यान, या प्रतिज्ञापत्राद्वारे सचिन पायलट यांच्याकडे असणाऱ्या संपत्तीचाही खुलासा झाला आहे. सचिन पायलट यांनी आज दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे एकूण ७.५ कोटी रुपयांची संपत्ती आहे. २०१८ मध्ये त्यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे ३.८ कोटी रुपयांची संपत्ती होती. म्हणजेच पाच वर्षांत त्यांच्याकडची संपत्ती दुप्पट झाली आहे.

Story img Loader