Karnataka Vidhan Sabha Election Results 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने मोठी आघाडी घेतली आहे. मतमोजणीचा कल हाच राहिला तर काँग्रेस स्पष्ट बहुमतासह कर्नाटकमध्ये सरकार स्थापन करेल. विशेष म्हणजे कर्नाटक विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मंत्री, वरिष्ठ नेते प्रचारासाठी उतरले होते. यानंतरही भाजपाला पराभवाचा सामना करावा लागताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर राजस्थान काँग्रेसचे नेते सचिन पायलट यांनी कर्नाटकमधील काँग्रेसचा विजय आणि भाजपाचा पराभव याचं कारण सांगितलं आहे.
सचिन पायलट म्हणाले, “काँग्रेसला पूर्ण बहुमत मिळत आहे. मोठ्या संख्येने आम्ही कर्नाटकात विजयी होऊ. ४० टक्के दलाली घेणारं भाजपा सरकारविरोधात आम्ही दिलेल्या घोषणेला जनतेने स्विकारलं. तो भाजपाच्या पराभवातील मोठा मुद्दा राहिला. लोकांनी तो मुद्दा स्विकारला आणि काँग्रेसला बहुमत दिलं.”
कर्नाटक निकालाचे कल जाहिर होताच संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
दरम्यान, कर्नाटक निवडणुकीच्या निकालावर बोलताना संजय राऊत म्हणाले, “कर्नाटकात काँग्रेस केवळ आघाडीवर नाही, तर सत्ता स्थापन करेल. काँग्रेसला पूर्ण बहुमत मिळत आहे. कर्नाटकमधील काँग्रेसचा विजय कर्नाटकमधील भाजपाचा पराभव नसून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आहे. मोदी-शाहांनी हा पराभव स्विकारला पाहिजे. या दोन प्रमुख नेत्यांनी कर्नाटकात अक्षरशः तंबू ठोकला होता.”
“मोदी-शाहांनी हा पराभव स्विकारावा”
“कर्नाटकच्या जनतेने मोदी-शाहांना झिडकारलं आहे, हे मान्य करा. अनेक ठिकाणी महाराष्ट्रातील भाजपा नेते गेले. ते जिथे जिथे गेले तिथे तिथे भाजपाचा मोठा पराभव झाला. महाराष्ट्रातून भाजपा नेत्यांची मोठी टोळी काँग्रेस, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पराभवासाठी कर्नाटकात गेली. त्या प्रत्येक ठिकाणी भाजपाचा दारूण पराभव झाला. कर्नाटकातील निकाल २०२४ साठी विरोधी पक्षांसाठी सत्तेचा दरवाजा उघडणारा असेल. २०२४ मध्ये असाच निकाल लागेल. ही एक लोकभावना आहे. देशाची मन की बात कर्नाटकातून बाहेर पडली,” असं मत संजय राऊतांनी व्यक्त केलं.