महाराष्ट्रासह देशभरात लोकसभा निवडणुकीसाठी पाचव्या टप्प्यातील मतदान होत असताना मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं मतदारांना पुन्हा एकदा आवाहन केलं आहे. सचिन तेंडुलकरनं मुलगा अर्जुन तेंडुलकरसह मुंबईत मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना सचिननं मतदान टाळणाऱ्या नागरिकांना विनंतीवजा समज दिली. मतदानाच्या पूर्वसंध्येला, अर्थात १९ मे रोजीही सचिननं त्याच्या अधिकृत एक्स हँडलवर पोस्ट करून मतदारांना मोठ्या संख्येनं मतदानासाठी बाहेर पडण्याचं आवाहन केलं होतं.
काय होती सचिन तेंडुलकरची पोस्ट?
सचिन तेंडुलकरनं रविवारी केलेल्या पोस्टमध्ये निवडणुकीची तुलना क्रिकेटच्या सामन्याशी केली होती. “एखाद्या सामन्यामध्ये उपस्थित प्रेक्षकांच्या गर्दीची आवडती टीम प्रत्येक वेळी जिंकेलच असं नाही. पण लोकशाहीमध्ये मोठ्या संख्येतल्या लोकांची आवडती टीम नेहमी जिंकते. नागरिक म्हणून आपल्याला ही केवढी मोठी शक्ती मिळाली आहे. चला, मतदान करुया”, असं सचिन तेंडुलकरनं आपल्या पोस्टमध्ये नमूद करत नागरिकांना मतदानासाठी बाहेर पडण्याचं आवाहन केलं होतं.
सोमवारी मुंबईतील आपल्या मतदान केंद्रावर सचिन तेंडुलकर मुलागा अर्जुन तेंडुलकरसह दाखल झाला. यावेळी माध्यमांना आपण कोणत्याही प्रश्नांची उत्तरं देणार नसून फक्त आपली भूमिका मांडू, असं त्यानं आधीच स्पष्ट केलं. यानंतर आपण निवडणूक आयोगाचे नॅशनल आयकॉन असल्याची बाब सचिन तेंडुलकरनं सांगितली.
“मी निवडणूक आयोगाचा नॅशनल आयकॉन आहे. मतदानासंदर्भात जनजागृती करण्यासाठीच्या अनेक उपक्रमांमध्ये मी सहभागी होतो. त्याचा मला सार्थ अभिमान आहे”, असं सचिन तेंडुलकर यावेळी म्हणाला.
घरात बसणाऱ्या मतदारांना दिली समज!
दरम्यान, सचिन तेंडुलकरनं यावेळी मतदानाला जाणं टाळून घरीच थांबणाऱ्या किंवा इतर ठिकाणी जाणाऱ्या मतदारांना समज दिली आहे. “समस्या दोन प्रकारे निर्माण होतात. एक तर तुम्ही विचार न करता कृती करता किंवा फक्त विचार करता, त्यावर कृती करत नाहीत. मी फक्त एवढीच विनंती सगळ्यांना करेन की कृपा करून तुम्ही मतदानाला या. आपल्या देशाच्या भवितव्यासाठी हे फार महत्त्वाचं आहे”, अशा शब्दांत सचिन तेंडुलकरने मतदारांना आवाहन केलं आहे.