माहीम विधानसभा मतदारसंघात मनसेने राज ठाकरे यांचे सुपूत्र अमित ठाकरे यांना उमदेवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे महेश सावंत रिंगणात आहेत. याशिवाय महायुतीतील शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटानेही सदा सरवणकर यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, माहीममध्ये महायुतीने अमित ठाकरे यांना पाठिंबा द्यावा, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. यातूनच सदा सरवणकर यांच्यावर उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव असल्याचेही बोललं जात आहे. अशातच आता सदा सरवणकर यांनी एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत राज ठाकरेंना भावनिक आवाहन केले आहे.
नेमकं काय म्हणाले सदा सरवणकर?
“मी ४० वर्षांपासून शिवसेनेचा कार्यकर्ता आहे. मी कष्टाने आणि घामाने तीन वेळा माहीमचा आमदार झालो. बाळासाहेब असते, तर त्यांनी मला त्यांच्या नातेवाईकांसाठी जागा सोडायला सांगितली नसती. त्यांचे ५० नातेवाईक दादर-माहिममध्ये राहतात, पण उमेदवारी त्यांनी माझ्यासारख्या सामान्यकार्यकर्त्याला दिली, ते कार्यकर्त्याची भावना जपणारे नेते होते”, असं सदा सरवणकर म्हणाले.
“माझ्यासारख्या कार्यकर्त्यांवर अन्याय करू नका”
पुढे बोलताना त्यांनी राज ठाकरेंना भावनिक आवाहन केले. “एकनाथ शिंदेंकडे पाहा त्यांचे सुपुत्र हे तीन वेळचे खासदार असताना सुद्धा त्यांनी आपल्या मुलाला केंद्रात मंत्री बनवले नाही, तर एका निष्ठावंत शिवसैनिकाला संधी दिली. मी राज ठाकरेंना विनंती करतो की माझ्यासारख्या कार्यकर्त्यांवर अन्याय करू नका, मला आपले समर्थन द्या ”, असे ते म्हणाले.