Sada Sarvankar Amit Thackeray Mahim Assembly Election 2024 : माहीम विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना उमदेवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात शिवसेनेचे (ठाकरे) महेश सावंत निवडणुकीच्या रिंगणात आहेत. याशिवाय महायुतीतील शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाने विद्यमान आमदार सदा सरवणकर यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, माहीममध्ये महायुतीने अमित ठाकरे यांना पाठिंबा द्यावा, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. भाजपा अमित ठाकरेंच्या पाठिशी उभी आहे. त्याचबरोबर शिवसेनेतील (शिंदे) अनेक नेते अमित ठाकरे यांना पाठिंबा देण्यास अनुकूल आहेत. मात्र एकनाथ शिंदे यांच्यासमोर सरवणकर व अमित ठाकरे यांच्यापैकी कोणाच्या पाठिशी उभं राहावं असा पेच आहे. सध्या तरी त्यांनी माहीममधील शिवसैनिक व सदा सरवणकर यांना पाठिंबा दिला असला तरी राज ठाकरे, भाजपा व महायुतीतील इतर पक्षांच्या दबावापुढे ते काय निर्णय घेणार असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

दरम्यान, सदा सरवणकर यांनी एक्स या समाजमाध्यमावर पोस्ट करत राज ठाकरेंना भावनिक आवाहन केले आहे. सरवणकर यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटलं आहे की मी ४० वर्षापासून शिवसेनेचा कार्यकर्ता आहे. मी मोठ्या कष्टाने आणि घामाने तीन वेळा माहिमचा आमदार झालो. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे आज असते तर त्यांनी मला आपल्या नातेवाईकांसाठी सीट सोडायला सांगितल नसती. त्यांचे ५० नातेवाईक दादर – माहिममध्ये राहतात. पण उमेदवारी त्यांनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला दिली. ते कार्यकर्त्याची भावना जपणारे नेते होते. एकनाथ शिंदेंकडे पाहा, त्यांचे सुपुत्र हे तीन वेळचे खासदार असूनही त्यांनी आपल्या मुलाला केंद्रात मंत्री बनवलं नाही, तर एका निष्ठावंत शिवसैनिकाला ती संधी दिली. राजसाहेबांना मी विनंती करतो, माझ्यासारख्या कार्यकर्त्यांवर अन्याय करू नका. मला आपले समर्थन द्या.

हे ही वाचा >> मनोज जरांगे आता दिल्ली हादरवणार? मुस्लीम, बौद्ध धर्मगुरुंची साथ? रणनिती तयार, हिंदीचा अडथळाही दूर

अंबादास दानवेंचा सरवणकरांचा चिमटा

सरवणकरांच्या या पोस्टवरून आता शिवसेनेच्या (ठाकरे) नेत्यांनी त्यांची फिरकी घेतली आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरवणकरांची पोस्ट रिपोस्ट करत म्हटलं आहे की “आपलं अंगण सोडून दुसऱ्याच्या अंगणात नाचलं की हे असं होतं असतं. तुम्ही आमदार शिंदे गटाचे, तुमच्या जागेचा फैसला करणार भलतेच पक्ष म्हणजे मनसे आणि भाजपा… घ्या सहन करून ‘महाशक्ती’च्या ढुसण्या आता!”

हे ही वाचा >> धनंजय मुंडेंच्या शपथपत्रात पाच अपत्यांचा उल्लेख, २०१९ मध्ये तिघांचीच नोंद; पाच वर्षांत संपत्तीही दुप्पट

अमित ठाकरेंवर कारवाई व्हावी यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेची निवडणूक आयुक्तांकडे तक्रार

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे दरवर्षी दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे दीपोत्सव साजरा केला जातो. या पार्कवर रोषणाई करून सेल्फी पॉइंट्स उभारले जातात. येथे फोट शूट करण्याकरता आणि स्नेहभेट घेण्याकरात अवघी मुंबापुरी उपस्थित राहते. परंतु, आता आचारसंहिता काळातही हा दीपोत्सव साजरा होत असल्याने शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाने यावर आक्षेप घेतला आहे. त्यांनी राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना यासंदर्भात पत्र पाठवून कारवाई करण्याच आवाहन केले आहे.