महाविकास आघाडीमधील नेत्यांनी वंचित बहुजन आघाडीला आपल्याबरोबर घेण्याचे प्रयत्न केले. मात्र हे प्रयत्न अपुर पडले. जागावाटपात मविआ आणि वंचितमधील चर्चा फिस्कटली आणि वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी ‘एकला चलो रे’चा नारा दिला. प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्रातील अनेक जागांवर त्यांचे उमेदवार उभे केले आहेत. स्वतः प्रकाश आंबेडकर अकोल्यातून लोकसभेची निवडणूक लढवत आहेत. तर आंबेडकरांनी बारामतीत राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) उमेदवार सुप्रिया सुळे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. यासह काँग्रेसच्या काही उमेदवारांना वंचित पाठिंबा देईल, असंही आंबेडकर यांनी जाहीर केलं आहे. मात्र महाविकास आघाडीने अकोल्यात प्रकाश आंबेडकरांच्या विरोधात उमेदवार उभा केला आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीमधील एका पक्षाच्या प्रमुखांने यावर नाराजी व्यक्त करत मविआचे प्रमुख नेते शरद पवार यांना पत्र लिहिलं आहे. तसेच प्रकाश आंबेडकरांविरोधात काँग्रेसने उमेदवार उभा करू नये यासाठी शरद पवार (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार) आणि उद्धव ठाकरे (ठाकरे गटाचे प्रमुख) यांना प्रयत्न करण्याची विनंती केली आहे. समाजवादी गणराज्य पार्टीचे अध्यक्ष आणि आमदार कपिल पाटील यांनी पवारांना पत्र लिहून काँग्रेसच्या उमेदवाराविरोधातही नाराजी व्यक्त केली आहे.

प्रकाश आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी यांना महाविकास आघाडीत सामावून घेता आले नाही म्हणून त्यांना भाजपची बी टीम म्हणून हिणवले जात आहे, अपमानित केले जात आहे, याबाबत कपिल पाटील यांनी पत्रात नाराजी व्यक्त केली आहे.

कपिल पाटील यांनी पत्रात काय म्हटलंय?

…म्हणून अकोल्यात प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा द्यायला हवा

शरद पवार साहेब, सप्रेम नमस्कार,

महाराष्ट्र हा फुले – शाहू – आंबेडकर विचारधारेवर उभा आहे. महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य चळवळीत सर्वाधिक योगदान महाराष्ट्रानेच दिलं. छत्रपती शिवरायांचा वारसा असलेला महाराष्ट्र दिल्लीच्या तख्तापुढे कधी झुकला नाही. नथुरामी फॅसिस्ट शक्तींच्या विरोधात तुम्ही महाराष्ट्रात महाविकास आघाडी उभी केली. म्हणूनच समाजवादी गणराज्य पार्टी आणि राज्यातील सर्व डाव्या पुरोगामी शक्ती तुमच्या सोबत आहेत. तथापि, या आघाडीत नथुरामी फॅसिझमच्या विरोधात सातत्याने सर्वात प्रखर भूमिका घेणारे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर आणि त्यांची वंचित बहुजन आघाडी यांना सामावून घेण्यात आपल्या सर्वांना अपयश आले. त्याची सल आपल्याही मनात असेल.

प्रकाश आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी यांना महाविकास आघाडीत सामावून घेता आले नाही म्हणून त्यांना भाजपची बी टीम म्हणून हिणवले जात आहे, अपमानित केले जात आहे. हे कमी की काय म्हणून आता महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांना महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नातवाच्या आणि वंचित बहुजन आघाडीच्या विरोधी प्रचारात उतरवण्यात आले आहे. हे खरोखरच दुर्मानवी आहे. दुर्दैवी नव्हे दुर्मानवी यासाठी की बाबासाहेबांचा दैवावर विश्वास नव्हता. आणि सश्रद्ध माणसं मानवी चुकांसाठी दैवाला दोष देत नाहीत. ऐतिहासिक जखमांचं ज्यांना भान आहे, त्यांनी त्यावरची खपली का काढावी हे समजत नाही.

हे ही वाचा >> “सत्तेत आल्यावर पहिल्याच दिवशी…”, राहुल गांधींची भंडाऱ्यात अग्निवीर योजना आणि जीएसटीबाबत मोठी घोषणा

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे पणतू शाहू छत्रपती महाराज यांना कोल्हापूर लोकसभेत उमेदवारी देण्यासाठी आपण पुढाकार घेतला. ही आशा आणि विश्वास निर्माण करणारी घटना आहे. फुले – शाहू – आंबेडकरांचा महाराष्ट्र फॅसिस्ट जातीयवादी शक्तींना साथ देत नाही. हे आपण दाखवून दिलं आहे. त्याच भूमिकेतून खुद्द प्रकाश आंबेडकर यांनी शाहू छत्रपती यांना पाठिंबा जाहीर केला आहे. बारामतीत सुप्रियाताई सुळे यांच्या विरोधात सुद्धा उमेदवार त्यांनी दिलेला नाही. मात्र डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचे खरे वारस प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात काँग्रेसचा उमेदवार देऊन आपण मोठी चूक करत आहोत.

अकोल्यात काँग्रेसचे उमेदवार डॉ. अभय पाटील यांचे वडील संघ – भाजपचे होते म्हणून आक्षेप घेण्याचे कारण नाही. पण डॉ. अभय पाटील हे सुद्धा त्याच विचारांचे समर्थक आहेत. बाबरी मशीद पाडण्याचं आणि मुस्लिम विरोधी नफरतीचं ते आजही समर्थन करतात, तरीही ते आघाडीचे उमेदवार आहेत, हे धक्कादायक आहे. उद्या, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. त्या पार्श्वभूमीवर आपण अकोल्यात प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडीचा पाठिंबा जाहीर करावा, ही आग्रहाची विनंती.

हे ही वाचा >> सांगलीचं गणित बिघडणार? प्रकाश आंबेडकर मैदानात; प्रतीक पाटलांच्या भेटीनंतर मोठं वक्तव्य, म्हणाले, “विशाल पाटील जर…”

उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचे नेते आहेत आणि आपण पालक आहात, त्यामुळे आपण दोघांनी पुढाकार घेणं आवश्यक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न न देणं, संसद भवनात फोटोही न लावणं, मंडल आयोग दडपून ठेवणं अशा काँग्रेसच्या ऐतिहासिक चुकांचं पापक्षालन करण्याची याशिवाय दुसरी वेळ नाही. धन्यवाद!

आपला स्नेहांकित,
कपिल पाटील
अध्यक्ष, समाजवादी गणराज्य पार्टी