Sameer Bhujbal : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रातले दिग्गज नेते छगन भुजबळ यांच्या घरात बंडखोरी झाली आहे. त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्ष सोडत अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. सुहास कांदे यांच्या विरोधात आता समीर भुजबळ निवडणूक लढवतील. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही घडामोड राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षासाठी मोठा धक्का मानली जाते आहे. छगन भुजबळ हे अजित पवारांच्या निकटवर्तीयांपैकी एक मानले जातात. हेच छगन भुजबळ समीर भुजबळ यांची बंडखोरी रोखू शकलेले नाहीत.
समीर भुजबळ काय म्हणाले?
“साधारण वर्षभरापूर्वी तुम्ही सर्वांनी माझ्यावर विश्वास ठेवून मुंबई अध्यक्ष पदाची जबाबदारी माझ्याकडे सुपूर्द केली होती. ही जबाबदारी पार पडत असताना अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपण संघटन मजबुतीने उभं केलं. यामध्ये जिल्हाध्यक्ष पासून बुथपर्यंत संघटनेची बांधणी आपण केली. मात्र भुजबळ कुटुंबीयांच्या ऋणानुबंध असलेल्या नांदगाव मध्ये परिस्थिती अतिशय बिकट आहे. गेल्या पाच वर्षात या मतदारसंघातले वातावरण अतिशय दूषित झालेले असून येथील नागरिक भयभीत आहेत. नांदगाव मधील कार्यकर्ते पदाधिकारी आणि नागरिकांनी आपली भेट घेऊन याबाबतली कैफियत आपल्यासमोर मांडली होती. नांदगाव मधील नागरिकांची वाढत असलेली मागणी आणि नांदगाव मधील दहशतीचे वातावरण बदलण्यासाठी या मतदारसंघात विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय मी घेतला आहे. तरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मुंबई अध्यक्ष पदाचा मी राजीनामा देत आहे. तो आपण स्वीकारावा अशी नम्र विनंती आपण आतापर्यंत केलेल्या सहकार्याबद्दल मी आपला ऋणी आहे.
सुहास कांदेंवर टीका
“नांदगाव मतदारसंघामध्ये विकास खुंटला आहे. विकासाची अनेक कामे प्रलंबित आहेत. विद्यमान आमदार आल्यानंतर मतदारसंघामध्ये दुरावस्था झाली असल्याची माहिती समीर भुजबळ यांनी दिली आहे. नांदगाव मतदारसंघामध्ये अतिशय भयभीत वातावरण असल्याचे समीर भुजबळ म्हणाले. जागा शिवसेना शिंदे गटाकडे गेल्यामुळं दुसरा काहीतरी निर्णय घ्यावा असी कार्यकर्त्यांची मागणी होती. त्यामुळं मी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला.” समीर भुजबळ यावेळी म्हणाले.
छगन भुजबळ यांच्या घरात बंडखोरी
समीर भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार) सोडल्याने निवडणुकीच्या तोंडावर छगन भुजबळांच्या घरातच बंडखोरी झाली आहे. त्यामुळे आता इथली निवडणूक चुरशीची होणार यात काही शंकाच नाही. समीर भुजबळ हे छगन भुजबळ यांचे पुतणे आहेत. काही दिवसांपूर्वी पंकज भुजबळ यांना विधानपरिषदेवर आमदार म्हणून निवडण्यात आलं. त्यानंतर नांदगावमधून समीर भुजबळ यांना तिकिट मिळेल अशी चर्चा होती. मात्र तसं घडलं नाही. सुहास कांदे म्हणजेच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील नेत्याला संधी मिळाली. त्यामुळे नाराज समीर भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाची साथ सोडली आहे.