Sangamner Assembly Election 2024 Result : अहमदनगर जिल्ह्याच्या आणि राज्याच्या राजकारणात संगमनेर तालुका कायम चर्चेत असतो. या मतदारसंघामधून काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) तब्बल ७ वेळा आमदार झाले आहेत. २०१९ नंतर राज्याच्या राजकारणात अनेक राजकीय समीकरणं बदलले. त्यामुळे २०२४ ची विधानसभा निवडणूक अनेक नेत्यांसाठी प्रतिष्ठेची मानली जाते. यामध्ये संगमनेर मतदारसंघ अर्थात बाळासाहेब थोरातांचं नावही प्रामुख्याने घेतलं जातं.
बाळासाहेब थोरातांना काँग्रेसमधील दिग्गज नेते म्हणून ओळखलं जातं. या बरोबरच महाराष्ट्र काँग्रेसच्या (Congress) पहिल्या फळीतील नेत्यांमध्ये बाळासाहेब थोरातांचं नाव घेतलं जातं. सहकारातून राजकारणाला सुरुवात केलेले आणि तब्बल ७ वेळा आमदार झालेले बाळासाहेब थोरातांनी संगमनेर विधानसभा मतदारसंघात आपलं वर्चस्व कायम राखलं होतं. असं असलं तरी या विधानसभेच्या निवडणुकीत संगमनेर विधानसभा मतदारसंघात काही राजकीय गणितं बदलली आणि बाळासाहेब थोरातांचा पराभव झाला.
सहकाराचा बालेकिल्ला म्हणून नगर जिल्ह्याला ओळखलं जातं. आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना नगर जिल्ह्यातच आहे. नगर जिल्ह्यात एकूण बारा विधानसभा मतदारसंघ आहेत. संपूर्ण नगर जिल्ह्याचं राजकारण हे बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे यांच्या भोवती फिरतं. २०१९ च्या विधानसभेची निवडणूक ही भाजपा आणि शिवसेना युती विरुद्ध राष्ट्रवादी, काँग्रेस आघाडी अशी झाली होती. मात्र, त्यानंतर राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडल्या. आपण जर नगर जिल्ह्याचा विचार केला तर बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे हे नगर जिल्ह्यातील दोन मोठे नेते. आता संगमनेर विधानसभा मतदारसंघात राधाकृष्ण विखे हे थोरातांच्या विरोधात आपली शक्ती लावण्याची शक्यता नाकारता येत नाही. या विधानसभा निवडणुकीत संगमनेरमध्ये (Sangamner Vidhan Sabha Constituency) मोठी चुरस पाहायला मिळाली आहे.
हेही वाचा : Baramati Assembly Election : विधानसभेला बारामतीत काका-पुतण्या भिडणार का? कसं आहे राजकीय समीकरण?
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांच्या विरोधात शिवसेनेकडून साहेबराव नवले निवडणुकीच्या मैदानात होते. मात्र, नवलेंना ६३ हजार मते मिळाली होती तर थोरात १ लाख २५ हजार मते घेऊन ते विजयी झाले होते. त्यामुळे थोरातांचा बालेकिल्ला मजबूत राहीला. पण यंदाच्या विधानसभा निवडणुकीत माजी खासदार डॉ.सुजय विखे (Sujay Vikhe Patil) यांनी लोकसभेतील पराभवानंतर विधानसभा निवडणूक लढवण्यासंदर्भात संकेत दिले होते. काही दिवसांपूर्वी त्यांनी याबाबतची आपली इच्छाही माध्यमांसमोर बोलून दाखवली होती. “मला आता वेळ आहे, त्यामुळे शेजारी कुठे मला संधी मिळाली तर विधानसभेची निवडणूक लढवण्याचा माझा प्रयत्न असेल. राहुरी आणि संगमनेर हा पर्याय माझ्यासमोर आहे”, असं सूचक वक्तव्य डॉ.सुजय विखे यांनी केलं होतं. एवढंच नाही तर त्यानंतर डॉ.सुजय विखे आणि राधाकृष्ण विखे यांचे संगमनेरमधील दौरेही वाढल्याचं बोललं जातं. मात्र, महायुतीकडून डॉ.सुजय विखे यांना उमेदवारी मिळाली नाही. संगमनेरमध्ये महायुतीकडून अमोल खताळ यांना उमेदवारी मिळाली. त्यामुळे आता संगमनेरमध्ये थोरात पुन्हा आपला बालेकिल्ला शाबूत राखणार का? की अमोल खताळ बाजी मारणार? याकडे अनेकांचे लक्ष लागले होते. मात्र, अखेर या निवडणुकीत अमोल खताळ हे विजयी झाले आहेत तर बाळासाहबे थोरात यांचा पराभव झाला आहे.
संगमनेर मतदारांची संख्या
महाराष्ट्र राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघांपैकी एक संगमनेर विधानसभा मतदारसंघ आहे. संगमनेर विधानसभा मतदारसंघात २०१९ मध्ये काँग्रेस पक्षाचे बाळासाहेब थोरात हे निवडून आले होते. त्यांना १ लाख २५ हजार ३८० एवढं मतदान मिळालं होतं. शिवसेनेच्या साहेबराव नवले यांचा पराभव झाला होता. साहेबराव नवले यांना ६३,१२८ मतदान मिळालं होतं. संगमनेर विधानसभेचे एकूण मतदार २०१९ च्या आकडेवारीनुसार २ लाख ६८ हजार ७१५ एवढे आहे.
२०२४ च्या निवडणुकीत किती टक्के मतदान झालं?
अहमदनगर जिल्ह्यात एकूण ७१.७३ टक्के मतदान झालं. यामध्ये संगमनेर विधानसभा मतदारसंघात २०२४ च्या निवडणुकीत ६४.१३ टक्के मतदान झालं आहे.