यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक चर्चा झालेल्या महाराष्ट्रातील जागांमध्ये सांगलीबाबत मोठा पेच निर्माण झाला होता. सांगलीत आधी उद्धव ठाकरेंनी जाहीर सभेत चंद्रहार पाटलांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर विश्वजीत कदम यांचे कार्यकर्ते विशाल पाटील यांनी बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केला. या पार्श्वभूमीवर सांगली काँग्रेसमध्ये अस्वस्थता असल्याचं बोललं जात होतं. आज सांगलीत झालेल्या काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यात आमदार विश्वजीत कदम यांनी यासंदर्भात पक्षाच्या दिग्गजनेत्यांच्या समोरच परखड भाष्य केलं.
विशाल पाटील यांच्या बंडखोरीनंतर विश्वजीत कदम यांच्यााबाबतही तर्क-वितर्कांना उधाण आलं होतं. यासंदर्भात विश्वजीत कदम यांनी त्यांच्या पुढील वाटचालीबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. “गेल्या तीन महिन्यांपासून आम्ही मागणी करत होतो की सांगलीची जागा काँग्रेसलाच मिळावी. आमच्या एका तरुण सहकाऱ्याला आम्ही तयार केलं. त्याला मी विश्वास दिला की तुला खासदार करायची जबाबदारी माझी असेल. पारदर्शकपणे सगळं बाजूला ठेवून, जुना इतिहास बाजूला ठेवून आम्ही ही लोकसभा आमच्या एका तरुण सहकाऱ्याला दिली. तुम्ही सगळ्यांनी त्यासाठी प्रयत्न केले. पण शेवटी काय झालं?” असं विश्वजीत कदम भाषणात म्हणाले.
“कोल्हापूर आणि सांगलीचा काय संबंध?”
जागावाटपावेळी काय घडलं, यावरही विश्वजीत कदम यांनी भाष्य केलं. “राज्याच्या नेत्यांमध्ये चर्चा झाली तेव्हा असं ठरलं होतं की शाहू महाराज जो पक्ष निवडतील ती जागा त्या पक्षाला दिली जाईल. मग ते ठरलं असताना कोल्हापूर आणि सांगलीचा संबंध येतो कुठे? सांगलीतली साहजिक परिस्थिती म्हणजे दोन काँग्रेसचे आमदार, एक शरद पवारांचे आमदार, इथे संघटन, सहकारी संस्थांमध्ये काँग्रेस आहे. पण तरी काय झालं?” असं कदम म्हणाले.
“लोकशाहीत असं होतं का?”
चंद्रहार पाटलांना शिवसेनेत प्रवेश दिला तेव्हाच आम्ही सांगत होतो की आम्हाला थोडी काळजी वाटतेय. इथे काहीतरी चुकीचं घडेल असं वाटतंय. अचानकपणे उद्धव ठाकरे इथे आले आणि त्यांनी सांगलीच्या जागेची उमेदवारी जाहीर करून टाकली. लोकशाहीमध्ये असं होतं का? निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर असं होतं का? या जिल्ह्यात जर आम्ही काँग्रेस पक्षाचे आमदार, कार्यकर्ते असू तर किमान आम्हाला विचारायचं तरी होतं की काय करायचं. एकतर जागा देणंच चुकीचं होतं हे माझं ठाम मत आहे. हे माझं मत मी कधी बदलणार नाही.माझं हे ठाम मत होतं”, अशी ठाम भूमिका विश्वजीत कदम यांनी मांडली.
माघारीची चूक केली असती तर, सांगली बिनविरोध झाली असती – विशाल पाटील
“कोण काय करत होतं यावर का बारीक लक्ष नव्हतं हा माझा सवाल आहे”, असा प्रश्न कदम यांनी उपस्थित केला. “असं म्हणतात की मनासारखं काही होत नसेल तर दृष्ट लागते. आमच्या जिल्ह्याला दृष्ट लागली.पण मला एक सांगायचं आहे. या जिल्ह्यात ज्यांनी दृष्ट लावली, ती दृष्ट काढताही येते. ती काढायची जबाबदारी यापुढे इथे माझी आहे”, असं ते म्हणाले.
विश्वजीत कदमांची पुढील राजकीय भूमिका काय?
“महाविकास आघाडीच्या उमेदवाराला सांगलीत जी काही मतं मिळतील ती १०० टक्के काँग्रेसची मतं मिळणार आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात त्यांनी सांगलीत आवाज करायचा नाही की आम्हाला आता विधानसभा द्या वगैरे. काहीच संबंध नाही. आम्ही महाविकास आघाडीच्या धर्माचे आम्ही कार्यकर्ते आहोत. त्याबाबत वरीष्ठ जो काही आदेश देतील तो आम्ही पाळू. लोकसभेची जागा मिळवू शकलो नाही. पण याचा वचपा पुढे काढल्याशिवाय राहणार नाही”, अशा शब्दांत विश्वजीत कदम यांनी त्यांच्या पुढील भूमिकेवर भाष्य केलं.