नुकत्याच संपलेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका बसल्याचं स्पष्ट झालं आहे. महाविकास आघाडीला मतदारांनी ३० जागांवर घसघशीत यश दिलं. त्यामुळे महाराष्ट्रात जागा कमी आल्याचं मान्य करत देवेंद्र फडणवीसांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारली आहे. दुसरीकडे समोरच्या बाजूला महाविकास आघाडीला ३० जागा मिळाल्या असून त्यातील सर्वाधिक १३ जागा काँग्रेसला मिळाल्या आहेत. राज्यात एकमेव अपक्ष खासदार विशाल पाटील सांगलीतून निवडून आले आहेत. काँग्रेसमधून बाहेर पडून विशाल पाटील यांनी हा विजय मिळवल्यामुळे राजकीय वर्तुळात त्यांची चर्चा चालू आहे. या विजयाबाबत बोलताना विशाल पाटील यांनी काँग्रेसचा उल्लेख करत भाष्य केलं आहे.
सांगली लोकसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीत बऱ्याच वाटाघाटी झाल्या. जागावाटप अंतिम होण्याआधीच उद्धव ठाकरेंनी जाहीर सभेत चंद्रहार पाटील यांच्या नावाची घोषणा केली. त्यामुळे सांगली काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी पसरली. विश्वजीत कदम यांनी जाहीरपणे ही नाराजी बोलूनही दाखवली. त्यानंतर मात्र त्यांनी माघार घेत चंद्रहार पाटील यांची उमेदवारी मान्य केली. मात्र, विशाल पाटील यांनी बंडखोरी करत सांगलीतून अपक्ष अर्ज दाखल केला आणि ते विजयीही झाले.
काय म्हणाले विशाल पाटील?
विशाल पाटील यांनी निवडणूक निकालांसंदर्भात प्रतिक्रिया देताना प्रकाश आंबेडकरांचाउल्लेख केला. “सांगली लोकसभा निवडणुकीत माझा झालेला विजय पूर्णपणे जनतेचा आहे. माझ्या उमेदवारीचा निर्णय जनतेनंच घेतला. जनतेनं ही निवडणूक स्वत: हातात घेतली. लोकांनी दिलेली ही साथ पाहून मी भारावून गेलो आहे. मला मोठी साथ प्रकाश आंबेडकर यांनी दिली. त्यासाठी मी त्यांचे आभार मानतो. मी लोकसभेत संविधानाचं रक्षण करण्यासाठी चाललोय. मला इतर पक्षाच्या काही लोकांनी अनपेक्षितपणे पाठिंबा दिला”, असं विशाल पाटील म्हणाले.
“माझ्याकडे काँग्रेस पक्षाचं चिन्ह नसल्याचं दु:ख सर्व कार्यकर्त्यांना होतं. पण नवीन चिन्ह आणि काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून मला त्यांनी पुढे नेलं. निवडून आणलं. यामागे पक्षाची संघटना आहे. विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली गेल्या २-४ वर्षांपासून आम्ही ताकदीने काम करतोय. आम्ही सर्व निवडणुका ताकदीने लढतो. त्यामुळेच लोकसभेत आम्हाला मोठं पदाधिक्य मिळालं”, असं ते म्हणाले.
“आघाडीतल्याच काहींचं माझ्या पराभवासाठी षडयंत्र”
“वसंतदादांचा विचार धोक्यात आणण्याचा प्रयत्न कुणीतरी करायचा प्रयत्न करत होतं. आमच्या आघाडीतल्या काही लोकांनी जाणून-बुजून माझा पराभव व्हावा यासाठी षडयंत्र रचलं. आम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. भाजपाबरोबर बैठका घेऊन त्रास दिला गेला. पण जनतेनं आम्हाला तारलं. आम्ही ज्या विमानात बसलोय, त्याच्या पायलटना विमानातून काढण्याचा प्रयत्न त्यांनी केला. पण आमचे पायलट एवढे सक्षम आहेत की विमानात न बसता त्यांनी रिमोट कंट्रोलनं माझं विमान दिल्लीत पोहोचवलं”, असं सूचक विधान विशाल पाटील यांनी यावेळी केलं.
“यापुढच्या काळात आम्ही एकसंघ राहणार. ही एकी तात्पुरती नाहीये. ही कायमची आहे. सांगली काँग्रेसमय झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. जनतेतून निवडून येतो तेव्हा तो संघर्ष केल्याचं समाधान मिळतं. मला झालेल्या त्रासाबद्दल मी आज बोलणार नाही. आज आनंदाचा क्षण आहे. येणाऱ्या काळात आम्ही जनतेचे प्रश्न सोडवणार आहोत”, असंही ते म्हणाले.
“मला तिकीट मिळू नये म्हणून कारस्थानं झाली”
“यापूर्वी मी सांगलीच्या एका मेळाव्यात बऱ्यापैकी माझ्या भावना व्यक्त केल्या. त्यातला काही भाग राहिलेला आहे. तो योग्य वेळेस मी मांडणार आहे. मला व्यक्तिगत खूप त्रास झाला. माझ्याबाबत चुकीचं काहीतरी सांगून पक्षश्रेष्ठींशी वाद लावून देणं हेही झालं. अनेक वेगवेगळ्या स्तरावर मला तिकिट मिळू नये, यासाठीही काहींनी कटकारस्थान केलं. या सगळ्यावर सांगलीच्या जनतेनं अखेर मात केली. जनतेनं आम्हाला प्रेरणा दिली होती”, असं विशाल पाटील यावेळी म्हणाले.