सांगली : शिराळा विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीतील संभाव्य बंडखोरी टाळण्यासाठी वरिष्ठ नेत्यांच्या हालचाली सुरू आहेत. यासाठी बुधवारी रात्री मुंबईत अपक्ष उमेदवारी दाखल करणारे सम्राट महाडिक व जिल्हा बँकेचे संचालक राहुल महाडिक यांच्याशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी चर्चा केली. कार्यकर्त्यांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेऊ, असे आश्वासन महाडिकांनी यावेळी नेत्यांना दिले.
शिराळा मतदारसंघामध्ये महायुतीच्यावतीने सत्यजित देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, उमेदवारी डावलल्याने सम्राट महाडिक यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. महाडिक यांच्या उमेदवारीमुळे भाजपच्या अधिकृत उमेदवारापुढे अडचणी वाढणार आहेत. मतदारसंघातील भाजपची बंडखोरी टाळण्यासाठी महाडिक बंधूंना बुधवारी तातडीने मुंबईला पाचारण करण्यात आले. रात्री उशिरा मुख्यमंत्री शिंदे यांचे निवासस्थान असलेल्या वर्षावर चर्चा झाली. पक्षाच्या आणि महायुतीच्या विजयामध्ये अडचणी निर्माण होऊ नयेत. यापुढील काळात कार्यकर्त्यांवर जबाबदारी सोपविण्यात येईल तरी उमेदवारी मागे घ्यावी, असा सल्ला नेत्यांनी महाडिक यांना दिला.
यावर महाडिक यांनी सांगितले, कार्यकर्त्यांच्या इच्छेखातर उमेदवारी दाखल केली असल्याने कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच याबाबतचा निर्णय घेण्यात येईल. दिवाळी सणामध्ये याबाबत बैठक बोलावून निर्णय घेतला जाईल असे त्यांनी सांगितले.