Karnataka Vidhan Sabha Election Results 2023 : कर्नाटकमध्ये आज मतमोजणीला वेग आला आहे. सुरुवातीच्या कलांनुसार काँग्रेस आघाडीवर आहे. येत्या काही तासांतच निकाल स्पष्ट होईल. त्यामुळे काँग्रेस एकहाती सत्ता स्थापन करू शकेल, असा विश्वास काँग्रेस नेत्यांकडून व्यक्त केला जात आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही काँग्रेसच सत्ता स्थापन करेल, असा मोठा दावा केला आहे. आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावरही टीकास्त्र सोडलं आहे.
“कर्नाटकात काँग्रेस केवळ आघाडीवर नाही, तर सत्ता स्थापन करेल. काँग्रेसला पूर्ण बहुमत मिळत आहे. काँग्रेसचा विजय कर्नाटकमधील भाजपाचा पराभव नसून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आहे. मोदी-शाहांनी हा पराभव स्विकारला पाहिजे. कारण, या दोन प्रमुख नेत्यांनी कर्नाटकात अक्षरशः तंबू ठोकला होता”, अशी टीका संजय राऊतांनी यावेळी केली.
“कर्नाटकच्या जनतेने मोदी-शाहांना झिडकारलं आहे, हे मान्य करा. अनेक ठिकाणी महाराष्ट्रातील भाजपा नेते गेले. ते जिथे जिथे गेले तिथे तिथे भाजपाचा मोठा पराभव झाला. महाराष्ट्रातून भाजपा नेत्यांची मोठी टोळी काँग्रेस, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पराभवासाठी कर्नाटकात गेली. त्या प्रत्येक ठिकाणी भाजपाचा दारूण पराभव झाला. कर्नाटकातील निकाल २०२४ साठी विरोधी पक्षांसाठी सत्तेचा दरवाजा उघडणारा असेल. २०२४ मध्ये असाच निकाल लागेल. ही एक लोकभावना आहे. देशाची मन की बात कर्नाटकातून बाहेर पडली”, असा टोलाही त्यांनी लगावला.
आपल्याच लोकांना हरवण्यासाठी पैशांचा महापूर
महाराष्ट्र एकीकरण समितीसाठी आम्ही प्रयत्न केले. आम्ही हार जीत पाहत नाही. मराठी माणसं एकत्रित राहावं याकरता आम्ही जात असतो. पण तरीही एक तरी सीट एकीकरण समितीची लागले. या जागा जाव्यात याकरता फडणवीस आणि शिंदेंनी तिथे पैशांचा महापूर ओतला होता, अशी टीकाही संजय राऊतांनी केली. आपल्याच लोकांचा पराभव करण्यासाठी ही गद्दारी होती.