लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान चालू आहे. दरम्यान, मतदानाच्या आदल्या दिवशी महायुतीच्या नेत्यांनी, उमेदवारांनी वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये मतदारांना पैसे वाटल्याचे आरोप होत आहेत. महाविकास आघाडीने यापूर्वी आरोप केला होता की, अजित पवार गटाने बारामतीत, शिवसेनेच्या शिंदे गटाने कोल्हापुरात आणि भाजपाने साताऱ्यात पैसे वाटले आहेत. या आरोपांसह मविआतील नेत्यांनी पुरावे म्हणून काही व्हिडीओदेखील शेअर केले होते. त्यापाठोपाठ आता महायुतीच्या नेत्यांनी अहमदनगर आणि नाशिकमध्ये पैसे वाटल्याचे आरोप होत आहेत. आमदार रोहित पवार यांनी अहमदनगरमधील काही संशयास्पद व्हिडीओ समाजमाध्यमांवर शेअर केले आहेत. तर स्वतः मुख्यमंत्र्यांनी नाशिकमध्ये पैसे वाटप केल्याचा गंभीर आरोप शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नाशिकमध्ये हेलिकॉप्टरमधून उतरतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत दिसतंय की मुख्यमंत्र्यांचे सुरक्षा कर्मचारी हेलिकॉप्टरमधून भल्या मोठ्या बॅगा घेऊन उतरत आहेत. राऊत यांनी हा व्हिडीओ शेअर करत आरोप केला आहे की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तब्बल १२ ते १३ कोटी रुपये या बॅगांमध्ये भरून नाशिकमध्ये उतरले. तिथून त्यांनी ते पैसे एका हॉटेलात नेले. हॉटेलमध्ये बसून त्यांनी ते पैसे कोणाला दिले, त्यांनी ते पैसे कुठे नेले याबाबतची माहिती मी लवकरच सर्वांसमोर मांडेन.

संजय राऊत यांनी काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी राऊत म्हणाले. नाशिकमध्ये पैसे वाटण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री त्यांच्या हेलिकॉप्टरने तिकडे गेले होते. मुख्यमंत्री काल (१२ मे) बॅगा भरून पैसे घेऊन नाशिकला आले होते. मुख्यमंत्री केवळ दोन तासांसाठी नाशिकमध्ये आले. त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये खूप जड बॅगा होत्या. पोलिसांना त्या आवरत नव्हत्या. त्यात काय होतं? त्यात काही ५०० सूट किंवा ५०० सफाऱ्या होत्या का? मुख्यमंत्र्यांनी त्या बॅगा कोणत्या हॉटेलमध्ये नेल्या. तिथून ते पैसे कोणाला वाटण्यात आले? याची व्हिडीओ स्वरूपातील माहिती मी लवकरच सर्वांसमोर मांडणार आहे. ते पैसे मुख्यमंत्र्यांनी कोणाला दिले? कसे दिले? याची माहिती मी सर्वांना देणार आहे.

राऊत म्हणाले, त्या बॅगा इतक्या जड होत्या की पोलिसांना आवरत नव्हत्या. मुख्यमंत्री असे कुठेही गेले तर त्यांच्याकडे काय असतं? फार फार तर चार-पाच फाईल्स असतात. परंतु, आता आचारसंहितेत मुख्यमंत्री त्या फाईल्सवरही सही करू शकत नाहीत. मग या ९ ते १० भल्या मोठ्या बॅगांमध्ये नेमकं होतं तरी काय? ते केवळ दोन तासांसाठी नाशिकमध्ये आले. एका हॉटेलमध्ये बॅगा उतरवल्या, त्या बॅगा तिथून त्यांच्या लोकांपर्यंत पोहोचल्या.

राऊतांचे ईडीवर आरोप

संजय राऊत म्हणाले, एका बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की सक्तवसुली संचालनालय (ईडी) खूप उत्तम काम करत आहे. खरंतर ही ईडी म्हणजे भाजपाची गँग आहे, लुटारूंची टोळी आहे. राज्यात पैसे वाटप चालू असल्याचं त्यांना दिसत नाही. ईडी, सीबीआय आणि आयकर विभाग राज्यात भ्रष्टाचाराला पाठिंबा देत आहे. सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्टाचाराला लपवत आहेत. निवडणूक काळात महाराष्ट्रात पैशांचा पाऊस पडतोय. मी ठामपणे सांगतो की या उन्हाळ्यात कितीही पाऊस पडू द्या, मोदींचा पराभव होणार आहे हे नक्की. त्यांनी जर खरंच विकास केला असता तर त्यांच्यावर आज पैसे वाटायची वेळ आली असती का? नाशकातला व्हिडिओ हा त्याचा सर्वात मोठा पुरावा आहे. मी तो समाजमाध्यमांवर शेअर केला आहे.

हे ही वाचा >> “…तेव्हा मोरारजी देसाई म्हणाले होते, तुम्हाला गोळ्या..”, उद्धव ठाकरेंनी सांगितला ‘तो’ प्रसंग; मोदींचा उल्लेख करत म्हणाले…

बॅगांमध्ये काय होतं?

ठाकरे गटातील खासदार म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमधून नऊ बॅगा उतरवण्यात आल्या. त्या बॅगा पोलिसांना आवरत नव्हत्या. त्या नऊ बॅगांमध्ये काय होतं? कोणी याचं उत्तर देऊ शकेल का? याचं उत्तर मी देतो. त्या बॅगांमध्ये किमान १२ ते १३ कोटी रुपये होते. ते पैसे मुख्यमंत्र्यांनी त्या दिवशी नाशकात उतरवले, मुख्यमंत्री ते पैसे घेऊन एका हॉटेलमध्ये गेले. तिथे त्यांनी संबंधित लोकांना ते पैसे वाटले. ते पैसे मतदारसंघामध्ये वाटण्यात आले. त्यातील काही पैसे इतर ठिकाणीही गेले. मी आता फक्त बॅगांचा व्हिडिओ शेअर केला आहे. ते पैसे हॉटेलमधून कुठे आणि कसे गेले. याबद्दल मी लवकर सर्वांसमोर माहिती मांडणार आहे.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut claims eknath shinde landed in nashik with 9 bags full of money ahead of voting asc
Show comments