ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नरेंद्र मोदींवर पुन्हा एकदा जहरी टीका केली आहे. मागच्या महिन्यात संजय राऊत यांनी मोदींची तुलना औरंगजेबाशी केली होती. आता आज त्यांना एक प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी मोदींना गब्बर सिंगची उपमा दिली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन संजय राऊत यांच्या हस्ते संभाजीनगरमध्ये करण्यात आलं. त्यावेळी संजय राऊत यांनी मोदींवर बोचरी टीका केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

४०० पारचा नारा देता, लोकशाही तुमच्या बापाची आहे का?

“४०० पारचा नारा यांनी दिला आहे. लोकशाही काय तुमच्या बापाची आहे का? जनता काय ठरवायचं ते ठरवणार आहे. मोदी २०२४ मध्ये देशाचे पंतप्रधान होणार नाहीत ही काळ्या दगडावारची पांढरी रेष आहे. नरेंद्र मोदींच्या पक्षाचं जे खातं आहे त्याची पहिली यादी जेव्हा जाहीर झाली तेव्हा गोमांस निर्यात करणाऱ्यांकडून ५५० कोटींच्या देणग्या देण्यात आल्या आहेत. मोदींना काश्मिरी पंडितांचं दुःख समजून घेणं गरजेचं वाटलेलं नाही. या देशातलं वातावरण असं आहे की मोदींनी २०० जागा जिंकल्या तरी खूप झाल्या. आपली इंडिया आघाडी कुठल्याही परिस्थितीत ३०० पार होईल.” असंही संजय राऊत म्हणाले.

मोदींची तुलना थेट गब्बरशी

“देवेंद्र फडणवीस म्हणतात की आमच्याकडे नरेंद्र मोदींचा चेहरा आहे. मात्र तो चेहरा आहे की मुखवटा हे येणारा काळ ठरवेल. हा चेहरा अत्यंत भयावह आहे. लोक घाबरत आहेत त्या चेहऱ्याला. भूत आलं म्हणतात. लोकांना हा चेहरा नको आहे, गब्बर नंतर कुठल्या चेहऱ्याला लोक घाबरत असतील तर तो मोदींचा चेहरा आहे. शोलेमध्ये एक डायलॉग होता बच्चा सो जा नहीं तो गब्बर आ जायेगा, त्याप्रमाणेच यांच्याबद्दल लोकांना वाटतं आहे, कधीही टीव्हीवर येतील काहीही घोषणा करतील. हा चेहरा लोकांना नको आहे. फडणवीसांना काहीही बोलू द्या. पण भाजपाचं नेतृत्व ही भुताटकी आहे.” असं म्हणत संजय राऊत यांनी मोदींची तुलना शोलेतल्या गब्बरशी केली आहे.

हे पण वाचा- राज ठाकरेंचा संजय राऊतांना टोला, “कावीळ झालेल्यांना जग पिवळं दिसतं, आत्ताच तुरुंगातून..”

संभाजीनगर हे मराठवाड्याचं हृदय आहे. या ठिकाणी महाविकास आघाडीचा विजय होईल. महाविकास आघाडीबाबत मराठवाडा मला पॉझिटिव्ह दिसतो आहे. कल्याण काळेंच्या मागे आपण सगळे ठामपणे उभे राहिलो तर रावसाहेब दानवे पुन्हा दिल्ली पाहणार नाहीत. आपण हवं तर दानवेंना मर्सिडिझने पाठवू पण त्यांच्या घरी पाठवू असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.

नरेंद्र मोदी क्रमांक एकचा खोटारडा माणूस

एक नंबरचा खोटारडा पंतप्रधान आपल्या देशाला लागला आहे. खोटं बोलण्याची स्पर्धा ऑलिंपिकमध्ये लागली तर नरेंद्र मोदींना सुवर्णपदक मिळेल. आपलं सरकार आलं तर ही स्पर्धा आपण आयोजित करु आणि मोदींना पाठवू म्हणजे खोटं बोलण्यातलं गोल्ड मेडल ते आणतील. मोदींइतकं जलदगतीने खोटं बोलणारा माणूस मी पाहिलेला नाही असंही संजय राऊत म्हणाले.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut compares narendra modi with sholay film gabbar scj