देशभर झालेल्या सार्वत्रिक निवडणुकींची मतमोजणी आता अंतिम टप्प्यात आली आहे. शेवटच्या काही फेऱ्या बाकी असून अनेक मतदारसंघातील विजय जवळपास निश्चित झाला आहे. या निकालांनुसार एनडीए आणि इंडिया आघाडी यांच्यात काँटे की टक्कर पाहायला मिळतेय. त्यामुळे अंतिम निकाल हाती येत नाही तोवर देशाच्या गादीवर कोण बसणार हे सांगता येणार नाही. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला.
संजय राऊत म्हणाले, “लोकांनी नरेंद्र मोदीना हरवलं आहे. भाजपाला बहुमत नाहीय. भाजपा हरली आहे. गेल्या १० वर्षांपासून त्यांनी जनतेला मूर्ख बनवलं. अयोध्येत भाजपा हरली. जिथं एवढा मोठा इव्हेंट केला होता मोदींनी तिथं भाजपा हरली. देशाच्या जनतेने मोदींना नाकारलं आहे. मोदींना फेअरवेल दिला आहे. भाजपाने २०१४, २०१९ मध्ये पूर्ण बहुमत प्राप्त केलं होतं. परंतु, २०२४ मध्ये भाजपाला बहुमत नाही मिळालं, हा मोदींचा आणि अमित शाहांचा पराभव आहे.”
“राहुल गांधी, ममता बॅनर्जी, उद्धव ठाकरे, शरद पवार, अखिलेश यादव, तेजस्वी यादव या सर्वांनी मेहनत केली. मोदी आणि शाहांचा अहंकार त्यांनी संपवला आहे. मी दाव्यानिशी सांगतो की मोदींचं सरकार नाही बनणार. मोदींनी राजीनामा द्यावा. भाजपा हरली आहे. पंतप्रधान स्वतःला देव मानत होते, त्यांचं नाक कापलं गेलं. मुंबईत आणि महाराष्ट्रात मोदींना रोखलं आहे. आम्ही मुंबईत पाच जागा जिंकू”, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
देशात परिवर्तन होत आहे
“देशात परिवर्तन होत आहे. पूर्णपणे सकारात्मक निर्णय होत आहे. एक्झिट पोलनुसार आम्हाला १०० जागाही मिळणार नाहीत असं म्हणत होते, पण आताचा निकाल काय सांगतो. आज सायंकाळपर्यंत भाजपाच्या जागा कमी होतील. सरकार बनवण्यासाठी सर्वांना फोन आणि दारावर जात आहेत. त्यांच्याबरोबर जाण्यासाठी कोणीही तयार नाही. महाराष्ट्राने, उत्तर प्रदेशने आणि पश्चिम बंगालमध्ये मोठी खेळी केली आहे”, असंही संजय राऊत म्हणाले.
मुंबईत ठाकरे गटाची आघाडी
लोकसभा निवडणुकीच्या निकालाची उत्कंठा क्षणोक्षणी वाढत जातेय. मतमोजणीदरम्यान होणाऱ्या आकडेवारीचा आलेख कमी जास्त होत असला तरीही दुपारच्या सत्रात आता चित्र जवळपास स्पष्ट होतंय. मुंबईतील सहा मतदारसंघ हे दोन्ही शिवसेनेसाठी अत्यंत महत्त्वाचे होते. या मतदारसंघांमध्ये ठाकरे गटाची चांगली कामगिरी दिसू येतेय. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावरील आकडेवारीनुसार ठाकरे गटाने सर्व ४ जागांवर आघाडी घेतली आहे. तर, शिंदे गटाच्या मुंबईतील सर्व जागा पिछाडीवर आहेत.