लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. अशात संजय राऊत हे रोज काही ना काही वक्तव्यं करताना दिसत आहेत. याच संजय राऊत यांच्यावर महायुतीतले नेते गुलाबराव पाटील यांनी टीका केली आहे. संजय राऊत निराश आणि हताश माणूस असल्याचं गुलाबराव पाटील म्हणाले आहेत.

काय म्हटलं आहे गुलाबराव पाटील यांनी?

“संजय राऊत बोलण्यामध्ये पटाईत आहेत. मात्र त्यांची भाषा संस्कृतीला धरुन नाही. भा*** वगैरे म्हणणं हे योग्य नाही. तसंच संजय राऊत यांना अजून खानदेशी भाषा ठाऊक नाही. उद्या प्रचारात आम्ही भाषण करु तेव्हा खानदेशात काय काय पिकतं हे त्यांना आम्ही दाखवू. त्यांच्या भाषेपेक्षा आमची भाषा खालच्या दर्जाची आहे पण आम्ही पातळी सोडणार नाही.” असं गुलाबराव पाटील म्हणाले.

संजय राऊत वाया गेलेली केस

“निराश, हताश माणूसच बेताल वक्तव्य करतो. संजय राजाराम राऊत ही वाया गेलेली केस आहे त्याला ठाण्याच्या रुग्णालयात दाखवलं पाहिजे. कुणाला शिव्या देतो, कुणाला आणखी काय म्हणतो. तू इतके दिवस युती कुणाबरोबर केली होती तेव्हा तू कोण होतास? उद्धव ठाकरेंच्या गळ्यातले ताईत झाले आहेत संजय राऊत. पण त्यांनी सुसंस्कृतपणा सोडला आहे. संजय राऊतांपेक्षा मी जास्त वाईट बोलू शकतो पण आमच्यावर बाळासाहेबांचे संस्कार आहेत.” असंही गुलाबराव पाटील म्हणाले.

हे पण वाचा- नरेंद्र मोदींची हवा संपली, संजय राऊत यांचा दावा

अंगावर आलात तर शिंगावर घेऊ

“आम्ही अंगावर जात नाही, तुम्ही अंगावर आलाच आहात तर शिंगावर घेऊ. तुम्हाला हे सांगू इच्छितो की पान टपरीवर बसून आमदार होता येत नाही. आम्ही मेहनतही केली आहे. आम्ही आंदोलनं केली. बाळासाहेबांचे हुकूम मानले. आजही २४ तास जनतेची सेवा करतो आहे. सामनात अग्रलेख लिहून तू खासदार झाला आहेस. तू बिना मेहनतीचा खासदार झाला आहेस. बाळासाहेबांच्या शिवसेनेचं हिंदुत्व संपवलं आहे.” असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.