पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यापासून या निवडणुका व त्यांचे निकाल हा चर्चेचा विषय ठरला आहे. रविवारी या राज्यांमधील मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार व मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपावर सामनातील ‘रोखठोक’ या सदरातून परखड भाष्य केलं. यावेळी भाजपाच्या निवडणूक प्रचारनीतीवर संजय राऊतांनी टीकास्र सोडलं असून त्याच्या केंद्रस्थानी पंतप्रधान आहेत. “देवळात घंटा बडवून, शेंड्यांना तूप लावून, केदारनाथच्या गुहेत ध्यानस्थ बसल्याचं छायाचित्र प्रसिद्ध करून देशातील समस्या संपणार नाहीत”, असा खोचक सल्लाही राऊतांनी मोदींना दिला आहे.
काय आहे लेखात?
संजय राऊतांनी रोखठोक सदरातील आपल्या लेखात पाच राज्यांतील निवडणूक निकालांच्या पार्श्वभूमीवर मोदींना लक्ष्य केलं आहे. योगींनी हैदराबादचं नाव भाग्यनगर करण्याची घोषणा केल्यावरून त्यांनी भाजपावर टीका केली. “भाजपा म्हणजे देशातील शहरे व रस्त्यांची नावे बदलणारा कारखाना झाला आहे. उत्तर प्रदेशातील अलाहाबाद, फैजाबादसह अनेक जिह्यांची नावे योगींनी बदलली, पण प्रदेशातील गरिबी, बेरोजगारी त्यामुळे संपली नाही. हैदराबादच्या निजामाला स्वतंत्र भारतात विलीन व्हायचे नव्हते, पण सरदार पटेल यांनी पोलीस अॅक्शन घेतली व हैदराबादेतच निजामास शरण यावे लागले. हैदराबाद हे विजयाचे प्रतीक आहे. ते तसेच राहिले पाहिजे”, असं राऊतांनी नमूद केलं आहे.
“मोदींच्या कृतीत श्रद्धा कमी, प्रसिद्धी जास्त”
“तेलंगणाच्या प्रचारास जाण्यापूर्वी पंतप्रधान मोदी हे बालाजी तिरुपतीच्या मंदिरात पोहोचले. कपाळास चंदन, भस्म लावून ते मंदिरात पूजा-अर्चा करीत असल्याचे चित्र सर्वत्र झळकले. हा प्रचाराचाच एक भाग झाला. त्याआधी ते मथुरेत जाऊन कृष्णचरणी लीन झाले. त्यात श्रद्धा कमी व प्रसिद्धी, प्रचार जास्त. पाच राज्यांतील निवडणुका सरकारच्या कामांवर, विकासाच्या मुद्द्यांवर नाही, तर सरळसरळ जातीय, धार्मिक, ध्रुवीकरण करून लढवल्या जात आहेत, पण आपला निवडणूक आयोगही भाजपच्या गाभाऱ्यात डोळे मिटून ध्यानस्थ बसला आहे”, अशी खोचक टीकाही राऊतांनी लेखातून केली आहे.
“देशाला फक्त एका पुरुष नेतृत्वाची गरज”
“मोदी हे युगपुरुष की विश्वपुरुष आहेत असे प्रमाणपत्र उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी मुंबईत येऊन दिले, पण या देशाला फक्त एका पुरुष नेतृत्वाची गरज आहे”, अशी टिप्पणी राऊतांनी केली आहे. “जम्मू-कश्मीरात दिवसाआड जवानांचे बळी जात आहेत. मोदी देवळात जाऊन पूजेला बसले म्हणून जवानांच्या हत्या थांबलेल्या नाहीत. हजारो कश्मिरी पंडित जे हिंदू आहेत ते आजही कश्मीरातील त्यांच्या घरी जाऊ शकलेले नाहीत. मोदींचा देव त्यांचे रक्षण करू शकत नाही. कारण धर्म आणि देवाचे अवडंबर माजवून फक्त मते मागितली जात आहेत”, असंही राऊतांनी नमूद केलं आहे.