गोवा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या एकत्र लढण्याच्या विचाराला धक्का दिला आहे. गोव्यात महाविकास आघाडीचीप्रमाणे काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत येणार नसल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. काँग्रेसने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यावरून गोव्यात महाविकास आघाडीच्या प्रयोगाची पुनरावृत्ती करण्यात काँग्रेसला अजिबात रस नसल्याचे स्पष्ट होते. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना मिळून भाजपाला धूळ चारू शकतात, असा दावा संजय राऊत सातत्याने करत होते. त्यानंतर आता संजय राऊत यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

 “आम्ही काँग्रेसकडे झोळी घेऊन उभे नाही आहोत. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसने गोव्यात एकत्र लढण्याचा प्रस्ताव त्यांच्या समोर ठेवला होता. राहुल गांधी यासाठी सकारात्मक आहेत पण गोव्याच्या स्थानिक नेतृत्वाच्या डोक्यात नक्की काय आहे हे मला माहिती नाही. ४० पैकी ३० जागा काँग्रेसलेल्या लढण्यास आम्ही सांगितले आहे. उरलेल्या १० जागांवर मित्र पक्षांना लढण्याची संधी द्या. काँग्रेस गेल्या ५० वर्षात ज्या जिंकू शकली नाही त्या जागा आम्ही मागितल्या आहेत. काँग्रेसच्या खिशातल्या जागा आम्ही मागितलेल्या नाहीत. गोव्यात एकत्र लढलो नाही तर काँग्रेसचे एक आकडी आमदार सुद्धा निवडणून येणार नाहीत. असे वातावरण असताना आमच्या सारखे काही पक्ष काँग्रेसला आधार देण्याचा प्रयत्न करत होते,” असे संजय राऊत म्हणाले.

याआधी गोव्यामध्ये आघाडीसाठी आम्ही प्रयत्न केले पण काँग्रेसच्या मनात आम्ही सत्ता आणू असे वाटत असल्याचे संजय राऊतांनी म्हटले होते. “गोव्यामध्ये महाविकास आघाडीसाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. आम्ही मनापासून प्रयत्न केले पण काँग्रेसच्या मनामध्ये आहे की ते गोव्यामध्ये स्वबाळावर सत्ता आणू शकतात. त्यांनी तसे संकेत दिल्लीत दिले असतील त्यामुळे ते मागेपुढे करत आहेत. काँग्रेसने आम्हाला काही जागा दिल्या आहेत पण आमच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. आम्ही प्रयत्न करत आहोत पण शिवसेना निवडणुका लढणार आहे,” असे संजय राऊतांनी म्हटले होते.

Story img Loader