गोवा विधानसभा निवडणुकांविषयी शिवसेनेच्या एंट्रीमुळे जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. संजय राऊत आणि शिवसेनेच्या इतर अनेक नेतेमंडळींनी गोव्यात केलेल्या प्रचारानंतर गोव्यात शिवसेनेचं खातं उघडण्याचा विश्वास बोलून दाखवला होता. आज गोव्यासह उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब आणि मणिपूरमधील मतमोजणीचे निकाल लागणार आहेत. निकालाच्या पहिल्या फेरीमध्ये गोवा आणि उत्तर प्रदेशातही शिवसेनेची पीछेहाट होत असल्याचं दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या मतमोजणी कलांविषयी भूमिका मांडली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“दोन वाजेपर्यंत चित्र स्पष्ट होईल”

“मी मतमोजणी पाहातोय. ती अजून सुरू आहे. पोस्टल बॅलेटवर जाऊ नका. दोन वाजेपर्यंत पूर्ण चित्र स्पष्ट होईल. पंजाबमध्ये आप पुढे आहे, उत्तराखंडमध्ये टक्कर सुरू आहे. गोव्यात स्थिती अजून स्पष्ट नाही. उत्तर प्रदेशात भाजपा पुढे आहे. हे पुढे-मागे सुरूच राहणार आहे. गोवा आणि पंजाबसाठी आत्ताच काही अंदाज लावणं मला योग्य वाटत नाही. पण अखिलेश यादव आणि त्यांची आघाडी उत्तर प्रदेशात कडवी टक्कर देत आहे”, असं राऊत म्हणाले आहेत.

“गोव्यात कुणालाही बहुमत नाही”

“पोस्टल बॅलेटवर संयमाने बोलायला हवं. २०-२० फेऱ्या होत असतात. बिहारमध्ये काय झालं हे तुम्ही पाहिलंच असेल. पंजाबमध्ये देखील अजून काही स्थिती स्पष्ट नाही. सर्व राज्यांमध्ये पूर्ण निकाल येईपर्यंत उद्याची सकाळ उजाडेल. गोव्यात माझ्यामते कुणालाही बहुमत मिळत नाहीये. खिचडी बऱ्याच ठिकाणी बनू शकते. फक्त गोव्यात नाही”, असं देखील राऊतांनी यावेळी सांगितलं.

“…तर काँग्रेसमध्ये स्फोट होतील”, योगेंद्र यादव यांनी वर्तवलं भाकित; म्हणाले, “२०२४मध्ये…”!

“संघर्ष करावाच लागतो”

“आम्ही खूप चांगलं काम केलं होतं. ही आमच्या पक्षाची महाराष्ट्राच्या बाहेर जाण्याची सुरुवात आहे. कोणताही प्रमुख पक्ष राज्याबाहेर जाताना पहिल्यांदा संघर्ष करावाच लागतो. ही आम्ही पक्ष बाहेर नेण्याची सुरुवात केली आहे. आम्ही थांबणार नाही”, असा निर्धार यावेळी राऊतांनी बोलून दाखवला आहे.

UP Assembly Election Results 2022 Live: योगी पुढे जाणार हे नक्की होतं – संजय राऊत

“गोव्यात गेल्या वेळी जे झालं, ते…”

दरम्यान, २०१७मध्ये बहुमत असूनही अंतर्गत समन्वयाच्या अभावामुळे गोव्यात काँग्रेसला सत्तेपासून वंचित राहावं लागलं होतं. तसा काही प्रकार यावेळी होणार नसल्याचं संजय राऊत म्हणाले आहेत. “गेल्या वेळी गोव्यात जे झालं, ते यावेळी होणार नाही. पी. चिदम्बरम तिथे बसले आहेत. आम्ही सगळे त्यांच्यासोबत आहोत. त्यांना महाराष्ट्राकडून जी काही मदत लागेल, ती आम्ही देऊ”, असं ते म्हणाले.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut on goa election results congress support shivsena candidate pmw