पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांना आणि वर्तमानपत्रांना मुलाखती देत आहेत. दरम्यान, एका मुलाखतीत मोदी म्हणाले, उद्धव ठाकरे (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री) हे माझे मित्र असून मी त्यांच्या अडचणीच्या काळात त्यांना मदत करण्यासाठी सर्वात आधी हजर असेन. ते बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र आहेत. बाळासाहेबांचं माझ्यावर खूप प्रेम होतं. ते कर्ज मी कधीच विसरू शकणार नाही. तसेच मोदी यांनी यावेळी सांगितलं की, उद्धव ठाकरे आजारी असताना मी सातत्याने त्यांना फोन करून त्यांच्या तब्येतीची विचारपूस करत होतो.” मोदींच्या या वक्तव्यावर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडच्या काळात उद्धव ठाकरेंवर कोणत्याही प्रकारची टीका केलेली नाही. तसेच त्यांच्याशी मैत्री असल्याचं मोदींनी सांगितलं. यामुळे मोदी यांनी उद्धव ठाकरे यांच्यासाठी महायुतीचा दरवाजा उघडल्याची चर्चा सुरू झाली आहे. यावर आता शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत यांनी काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी ते म्हणाले, नरेंद्र मोदी खोटं बोलत आहेत. ते सध्या स्वतःच अडचणीत आहेत. अडचणीतला व्यापारी स्वतःच्या फायद्यासाठी सर्वात जास्त खोटं बोलतो, असं चाणक्याने (कौटिल्य) सांगितलं आहे. मोदींना चाणक्याचं फार वेड आहे. मोदींसह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनादेखील चाणक्याचं वेड आहे. मात्र मोदी त्या मुलाखतीत जे काही बोलले ते खोटं आहे. अडचणीत असल्यामुळेच मोदी खोटं बोलत आहेत. मुळात मोदी यांनीच अडचणी निर्माण केल्या आहेत.

खासदार राऊत म्हणाले, महाराष्ट्रात आणि शिवसेनेत मोदींनीच अडचणी निर्माण केल्या आहेत. त्यांना आत्ता प्रेमाचा हा जो काही पान्हा फुटला आहे तो जर खरंच फुटला असता तर त्यांनी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना तोडली नसती. त्यांनी शिवसेना नुसतीच तोडली नाही तर बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचं नाव त्या बेईमान माणसाला (मुख्यमंत्री एकनाथ शिंदे) देण्याचे कृत्य केलं. त्यांनी शिवसेनेचा धनुष्य त्या बेईमान माणसाच्या हातावर ठेवला. त्यामुळे हे जे काही प्रेम उफाळून आलंय ते खोटं आहे.

हे ही वाचा >> उद्धव ठाकरेंसाठी महायुतीचे दरवाजे खुले? पंतप्रधानांच्या वक्तव्यावर भुजबळ म्हणाले, “राजकारणात आजचा शत्रू…”

पत्रकार परिषदेत राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे यांच्याबद्दल जे वक्तव्य केलं त्यावरून असं वाटतंय की त्यांनी शिवसेनेसाठी (ठाकरे गट) महायुतीची एक खिडकी उघडी ठेवली आहे. याकडे तुम्ही कसं पाहता? यावर संजय राऊत म्हणाले, त्यांनी खिडकी उघडू देत किंवा दरवाजा उघडला तरी आम्ही त्या दरवाजासमोर उभे राहणार नाही. कारण स्वाभिमान नावाची काही गोष्ट असते ना… आणि महाराष्ट्रात अजून तो स्वाभिमान शिल्लक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात आम्ही तो स्वाभिमान अजून टिकवून ठेवला आहे. परंतु, नरेंद्र मोदींची ही वक्तव्ये पाहता ते निवडणूक हरत आहेत असं दिसतंय. त्यांना माहिती आहे की, या लोकसभा निवडणुकीत भाजपाला बहुमत मिळत नाहीये म्हणून ते आता फटी, दरवाजे, खिडक्या उघडायच्या मागे लागले आहेत.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut reacts on is narendra modi opens nda doors for uddhav thackeray asc